संक्रांतीचे वाण, गरजूंसाठी ठरले दान
By admin | Published: January 31, 2015 12:51 AM2015-01-31T00:51:54+5:302015-01-31T00:51:54+5:30
जुन्नर येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संक्रांतीच्या औचित्याने ‘तुमचं संक्रांतीचं वाण, गरजूंसाठी ठरेल अनोखे दान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला
लेण्याद्री : जुन्नर येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संक्रांतीच्या औचित्याने ‘तुमचं संक्रांतीचं वाण, गरजूंसाठी ठरेल अनोखे दान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला जुन्नर तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सलग दुसऱ्या वर्षी राबविलेल्या या उपक्रमातून एक टेम्पोभरुन साहित्य नगर येथील ‘स्नेहालय’ या संस्थेतील गरजू मुलांसाठी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गाडेकर यांनी दिली.
उपक्रम अत्यंत स्पृहणीय असल्याची भावना स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अनेक संस्था काम करतात. अशाही संस्थांसाठी महिलांनी हा उपक्रम राबविल्यास संक्रांतीचे हे अनोखे उपक्रमशील मॉडेल ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत जुन्नर, ओतूर, नारायणगाव येथे तिळगूळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य आम्हाला द्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यातून ९० किलो तांदूळ, ४७ किलो साखर, ४९ किलो गहू, दोन हजार २२ बिस्किट पुडे, १३६ साबण, तसेच डाळी, कडधान्ये, तेल, मसाला, मुलांसाठी युनिफॉर्म, टॉवेल, कानटोप्या, दप्तरे, पेन्सिली, टूथपेस्ट, ब्रश, १,८०० आठशे पेन, १०८ पेन्सिली,चारशे वह्या, स्टीलची भांडी असे विविध प्रकारचे साहित्य जमा झाले होते.
विद्यासंस्कार प्रतिष्ठानचे विश्वस्त, विद्या ग्रुपचे संचालक, शिक्षकवृंद यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न केले. समाजातील अनेक लोकांना गरजूंसाठी मदत करण्याची इच्छा असते. परंतु गरजू कोण आणि त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहचवायची, हा प्रश्न अनेकांना असतो.
या समाजाच्या दातृत्वाला संक्रांतीचे निमित्त माध्यम बनवून जो उपक्रम विद्यासंस्कार प्रतिष्ठानने केला, तो खरोखर स्पृहणीय आहे, अशी प्रतिक्रिया महिला बचत गटांचे कार्य करणाऱ्या राजश्री बोरकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)