पुण्यात ओशो आश्रमात संन्यासिनीचा साधकाकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:30 AM2022-02-17T09:30:43+5:302022-02-17T09:34:11+5:30
बाणेर येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे...
पुणे : ओशो आश्रमात गेल्या २५ हून अधिक वर्षे ध्यानसाधना करण्यासाठी येत असलेल्या संन्यासिनीने आश्रमातील ८१ वर्षांच्या साधकावर विनयभंग केल्याचा आरोप केला असून, कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योग प्रताप ऊर्फ लाल प्रताप (वय ८१, रा. ओशो आश्रम, कोरेगाव पार्क) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ओशो यांच्या भक्त असून, त्या १९९६ पासून ओशो आश्रमात ध्यानसाधना करण्यासाठी नियमित येत असतात. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्यान करण्यासाठी त्या आश्रमात गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी या सत्संग कार्यक्रमासाठी जात असताना योग प्रताप यांनी त्यांना हातवारे करून जवळ बोलावून घेतले. फिर्यादी यांचे गळ्यातील ओशो यांचे छायाचित्र असलेली संन्यासी माळ काढून टाकण्यास सांगितले व गेट आऊट असे मोठमोठ्याने बोलून विनयभंग केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. योग प्रताप हे ओशो आश्रमाच्या विश्वस्तांपैकी एक असून, कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगोले तपास करीत आहेत.