संस्कार ग्रुपच्या कार्यालयाची तोडफोड
By admin | Published: September 1, 2016 01:22 AM2016-09-01T01:22:32+5:302016-09-01T01:22:32+5:30
वडमुखवाडी येथील संस्कार ग्रुपमध्ये महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे
आळंदी : वडमुखवाडी येथील संस्कार ग्रुपमध्ये महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. बुधवारी पाचशेहून अधिक महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
सकाळी अकरापासूनच महिला एकत्रित आल्या व त्यांनी कार्यालयात येऊन गुंतवलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, संस्थेतील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महिलांचा उद्रेक झाला.
आळंदीसह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील महिलांनी यात गुंतवणूक केली असल्याचे समोर येत आहे. वडमुखवाडीत संस्कार महिला बचत गट महासंघ आणि संस्कार ग्रुप आॅफ फायनान्सच्या नावाने गेल्या सात-आठ वर्षांत जादा व्याजाचे आमिष दाखवल्याने हजारो महिलांनी यात गुंतवणूक केली आहे. संस्थेने आजपर्यंत या महिलांना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून परतावा देण्यासाठी केवळ तारखाच दिल्या. काहींना धनादेश दिले, तेही वटले नाहीत.
दिघी पोलिसांच्या वतीने बंदोबस्तही मागविण्यात आला होता. या वेळी पोलीस आणि संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून संस्था पुढील १0 आॅक्टोबरपर्यंत सर्वांची देणी देईल, असे सांगितले. यावर काही महिलांनी वाट पाहण्याचा मार्ग अवलंबला. मात्र, काही
महिलांचा उद्रेक कायम होता. त्यांनी संस्थेच्या गेटसमोर धरणे धरले. त्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आक्रमक महिलांनी तोडफोडही केली.
दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्येही अनेक जणांची फसवणूक झाली आहे. पैसे परत मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. वेगवेगळ्या बोगस वित्तीय संस्थांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(वार्ताहर)