अभ्यासक्रमात संस्कृत भाषा अनिवार्य नसणे निराशजनक चित्र : न्या. नरेंद्र चपळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 07:59 PM2018-03-31T19:59:11+5:302018-03-31T19:59:11+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्कृत भाषेला जो दर्जा मिळणे अपेक्षित होते तो मिळाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संस्कृतचा जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे तेवढा तो झालेला नाही.
पुणे : मराठी वाडमयावर इंग्रजी भाषेतील नाटकांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. परंतु ,संस्कृत साहित्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही. कारण संस्कृत भाषेमध्ये मुबलक साहित्य उपलब्ध नाही. संस्कृत सर्व भाषांची आद्य भाषा म्हणून ओळखली जाते. मराठी भाषा शिकण्यासाठी संस्कृत भाषेची आवश्यकता आहे.परंतु ,अभ्यासक्रमात संस्कृत भाषा हा अनिवार्य विषय नाही हे चित्र निराशजनक असल्याची खंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केली.
उन्नती पब्लिशिंग हाऊसतर्फे डॉ. मंगला मिरासदार यांनी लिहिलेल्या राजमुद्रा अर्थात ‘मुद्राराक्षसम’ या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. सरोजा भाटे, उन्नती पब्लिशिंगचे राजीव मिरासदार उपस्थित होते.
चपळगावकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्कृत भाषेला जो दर्जा मिळणे अपेक्षित होते तो मिळाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संस्कृतचा जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे तेवढा तो झालेला नाही. संस्कृत भाषेत जे साहित्य उपलब्ध आहे ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. संस्कृत भाषेचा वारसा जपण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक इतिहास मांडणे गरजेचे आहे.
डॉ. भाटे म्हणाल्या, आजकाल राजकारणात प्रवेश करताना घराणे, जात,धर्म, वशिला हे निकष महत्वाचे मानले जातात. त्याऐवजी गुणवत्ता या निकषाला अधिक महत्व दिले पाहिजे. याकरिता राजमुद्रा अर्थात मुद्रा राक्षस ही कादंबरी प्रत्येक राज्यकर्त्याने वाचली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगला मिरासदार यांनी केले. राजीव मिरासदार यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------