ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संस्था चालक विनय अ-हाना पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:42 PM2023-10-25T18:42:15+5:302023-10-25T18:47:22+5:30
विनय अ-हानाच्या कारचालकाने ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते
किरण शिंदे
पुणे : संपूर्ण राज्यात सध्या चर्चा सुरू असलेल्या ससून रुग्णालयात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी प्रसिद्ध संस्थाचालक विनय अ-हानाला पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले. विनय अ-हाना याला ईडीने यापूर्वीच अटक केली होती. आता ललित पाटील फरार प्रकरणात त्याला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. तर दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ललित पाटील या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता.
त्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण राज्यात गाजले. ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावले असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासोबतच या ललितला कोणी-कोणी मदत केली याचा तपासही पोलीस करत होते.
तपासादरम्यान पुणे पोलिसांनी सुरवातीला अ-हानाचा चालक दत्ता डोके याला अटक केली होती. त्यानेच ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते. तसेच त्याच्याकडून 10 हजार रुपये देखील घेतले होते. मात्र तपासादरम्यान आणखी रंजक माहिती समोर आली. रुग्णालयात असताना ललित पाटील बाहेर फिरत होता. त्याला भेटण्यासाठीही अनेकजण येत होते. त्याचे काही सीसीटीव्ही देखील समोर आले होते.
दरम्यान विनय अ-हाना याचा चालक डोके याच्याकडे पुणे पोलिसांनी तपास केला असता विनय याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी आज विनय याला तळोजा कारागृहातून त्याचा ललित पाटील याच्या ससून रुग्णालयातून पळ काढल्याप्रकरणी ताबा घेतला आहे. त्याला पुणे पोलीस तळोजा कारागृहातून घेऊन पुण्यात रात्री उशिरा दाखल होतील. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.