आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:59 PM2022-07-23T19:59:08+5:302022-07-23T20:03:42+5:30
‘श्रीं’च्या भेटीने भाविकांचे डोळे पाणावले...
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : हलक्या पावसाच्या सरी... टाळ - मृदुंगाचा निनाद... 'माऊली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर... रांगोळीच्या पायघड्या व फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा शनिवारी (दि.२३) सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘श्रीं’ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले होते.
माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून “सर्व सुख गोडी साही शास्रे निवडी” या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरु असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माऊलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माऊलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक, श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर, हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणामंडपात पालखी स्थिरावली.
पालखीतील ‘श्रीं’च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मुळपीठ देवस्थानतर्फे श्रींना पिठलं भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्या वतीने पिठलं - भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली. दरम्यान माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती.
तत्पूर्वी, माउलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला. धाकट्या पादुका विसाव्यावर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. शहरात विविध वाद्यांच्या स्वरात माउलींच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी (दि. २४) दुपारी साडेबाराला ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदिक्षणा मिरवणूक होईल. हजेरी मारुती मंदिरात पालखी सोबतच्या दिंड्यांचे हजेरीचे अभंग घेतले जाणार आहेत.
आळंदीत माऊलींचा सोहळा आगमनापूर्वी थोरल्या पादुका मंदिर येथे 'श्रीं'चे वैभवी सोहळ्याचे परंपरेचे पालन करत ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांचे हस्ते पादुका पूजा व माऊलीची आरती करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, मानकरी, विणेकरी सेवक, चोपदार यांचा सत्कार अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला.