भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:38 PM2019-06-27T13:38:28+5:302019-06-27T13:52:07+5:30

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला...

sant dnyaneshwar and sant tukaram maharaj palkhi sohla came in pune! | भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

googlenewsNext
ठळक मुद्देआज दिवसभर पालख्यांचा पुण्यात मुक्काम शुक्रवारी पहाटे पंढरपूरकडे ठेवणार प्रस्थानतुकाराममहाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे दुपारी सव्वाचार वाजता आगमन याही वर्षी ज्ञानेश्वरमहाराजांची पालखीला पाटील इस्टेट चौकात येण्यास उशीर

पुणे :

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल,
कानडा विठ्ठल विटेवरी
कानडा विठ्ठल नामे बरवा, 
कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा!

विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस... वरुणराजाच्या हलक्या सरींनी केलेली सुखाची पखरण... टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर वारकºयांनी धरलेला फेर.... ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष... आकाशाला गवसणी घालू पाहणाºया भागवत धर्माची फडकत असणारी पताका... अशा भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज या दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज या दोन्ही पालख्यांनी बुधवारी (दि. २६) पुण्यनगरीमध्ये दिमाखात प्रवेश केला.  

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला. श्री संत तुकाराममहाराज आणि श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होताच शहराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. 


तुकाराममहाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे दुपारी सव्वाचार वाजता आगमन झाले, त्या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

निवास मंडपात पालखी सुमारे अर्धा तास स्थिरावली. सर्व दिंड्यांमध्ये विठूनामाचा गजर केला आणि अवघे वातावरण ‘विठू’मय झाले. वारकरी महिलांनी फुगडीचा फेर धरला होता. आबालवृद्धांनी फुगडीचा आनंद लुटला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन पालखीचे औक्षण केले. भजनाच्या तालावर महिलांनी फेर धरला आणि पालखी पुढे मार्गस्थ झाली.
........
याही वर्षी ज्ञानेश्वरमहाराजांची पालखीला पाटील इस्टेट चौकात येण्यास उशीर झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी सायंकाळी साडेसहाला पाटील इस्टेट येथे स्थिरावली. दोन्ही पालख्यांमध्ये दोन तासांचे अंतर पडले. पालखी मार्गावर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
........
संचेती चौकातून या दोन्ही पालख्या शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्त्याने ज्ञानेश्वर पादुका चौक आणि तुकाराम पादुका चौकात आल्या. त्या ठिकाणी आरती झाल्यावर पालख्या खंडूजीबाबा चौकातून लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाल्या. संत तुकाराममहाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात रात्री मुक्कामी विसावली, तर ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री मुक्कामाला पोहोचली.
.....
वारकऱ्यांसाठी पुणेकरांची सेवा  
वारकऱ्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून पाणी, बिस्किटे, पिशव्या आदी साहित्याचे वाटप करण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे कर्मचारी, अधिकारी यांनी मंडप उभारून विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीही बसवल्या होत्या. या चारही मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोफत चप्पल आणि बॅग यांची दुरुस्ती करुन देण्यात येत होती. 

..........
 संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास मुक्कामी पोहोचला. तर, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्री सुमारे १० वाजता भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात विसावली. गुरुवारी (दि.२७) रोजी दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यनगरीत असेल. शुक्रवारी (दि. २९) पहाटे परंपरेनुसार दोन्ही मंदिरांतील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची विधिवत पादुकांवर अभिषेक होईल. त्यानंतर काकड आरती होऊन दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ होतील. 
...............

दोन्ही पालखी सोहळ्यातील तील वारकऱ्यांनी शहराच्या विविध भागांत मुक्काम केला. या मुक्कामाच्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी वारकयांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केल्या. वारकºयांनी-देखील मुक्कामाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कीर्तन-भजन करून भक्तीसेवा केली. 
 

पुणे महापालिकेकडून पालख्यांचे स्वागत
पुणे महापालिकेच्या वतीने पाटील इस्टेट येथे संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज या दोन्ही पालख्यांचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले. महापौराच्या हस्ते दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांचा श्रीफल आणि तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आला. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंड, अतिरिक्त आयुक्त रुबेल अग्रवाल, डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते. तर, दापोडी येथील श्री संत तुकाराममहाराज पालखी विसावा ठिकाणी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालखीचे स्वागत केले.
............


 

Web Title: sant dnyaneshwar and sant tukaram maharaj palkhi sohla came in pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.