टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 04:47 PM2022-11-20T16:47:28+5:302022-11-20T16:47:40+5:30

रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता

sant dnyaneshwar maharaj alandi lakhs of citizens kartiki ekadashi | टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

Next

आळंदी : यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !!
             पांडुरंगे प्रसन्नपणे ! दिधले देणे हे ज्ञाना !!
             भूवैकंठ पंढरपूर ! त्याहुनी थोर महिमा या !!
              निळा म्हणे जाणोनि संता ! धावत येती प्रतिवर्षी !!       
     
या अभंगाप्रमाणे इंद्रायणीतीरी टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे कार्तिकी एकादशीच्या (दि.२०) दिवशी संपूर्ण अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. माऊलींच्या पालखी नगर प्रदक्षिणेवेळी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. तत्पूर्वी रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

 श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळेभरून दर्शन घेतले. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे.

 दरम्यान दुपारी साडेबाराच्या महानैवद्यानंतर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनीमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. या ठिकाणी सर्व दिंड्यावाल्यांची हजेरी घेऊन प्रत्येकी एक - एक अभंग सादर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला. 

Web Title: sant dnyaneshwar maharaj alandi lakhs of citizens kartiki ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.