Ashadhi Wari 2022: टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सुरु; आळंदीत लाखो भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 06:56 PM2022-06-21T18:56:03+5:302022-06-21T19:01:43+5:30
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. वारकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सर्वत्र ऐकू येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे होणार आहे. सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. आज सायंकाळी माउलींच्या पालखीचे देऊळवाड्यातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीत किमान ५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. बंदोबस्तातील पोलीस आणि संस्थानच्या सेवकांना काही वारकऱ्यांना मंदिर परिसरातून कमी करावे लागले आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने पायी वारीला परवानगी मिळाली आहे. कालच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे.
आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या उपस्थितीनं गजबजला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. कोविड काळानंतर दोन वर्षांनी आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा विना अटींमध्ये साजरा केला आहे.