संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 05:51 PM2024-06-29T17:51:54+5:302024-06-29T17:56:32+5:30
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे....
- भानुदास पऱ्हाड
आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायीवारी सोहळा शनिवारी (दि. २९) आळंदीतूनपंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. देऊळवाड्यात प्रस्थान सोहळा सुरू आहे. दरम्यान प्रस्थान सोहळादिनी आळंदीत दिवसभर माऊली नामाचा गजर सुरू होता. परिणामी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. तत्पूर्वी शुक्रवारी (दि. २८) देहूनगरीतून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान करून अनेक भाविक आळंदीत माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते. यंदा सुमारे साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदीत उपस्थिती लावली.
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे. शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले. परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून निघाली आहे. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. सद्यस्थितीत दर्शनरांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहचली आहे. प्रस्थान सोहळ्यानंतर आजोळघरात अनेकांनी रांगेतून दर्शन घेतले.
वाढती गर्दी लक्षात घेऊन शुक्रवारपासून (दि.२८) महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला होता. दरम्यान प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला टेम्पो, ट्रकमधून वारकरी भाविकांचे आगमन झाले. तर काही वारकरी पायी चालत आळंदीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या आगमनाने इंद्रायणी नदीतीर गजबजून निघाला आहे. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या हरीनामाचा गजर ऐकू येत आहे. तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावर आपल्या कुटंबियांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते.
पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार प्रसाद फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजली असून मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक 'ज्ञानोबा माऊलीचा' जयघोष करत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये क्षणभर विसवून हरीनामाचा जप करताना दिसत होते. अनेकांनी महाद्वाराबाहेर राहून प्रस्थान सोहळा अनुभला.
माऊलींची महापूजा...
माउलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ११ ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.
वारकरी बेभान नाचतात...
आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ - मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकारामां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. याप्रसंगी मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उद्या पुण्यात दुसरा मुक्काम...
आजोळघरात रविवारी (दि.३०) पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविला जाईल. सहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात येईल. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात येईल. तद्नंतर वाजत - गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावा घेईल. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती करण्यात येईल. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.
मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री प्रस्थान सोहळ्यात सहभागी...
आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. विशेषतः वारकऱ्यांसोबत भजनात ते दंग झाले. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुरलीधर मोहोळ यांनी एकत्रित फुगडी खेळली.