Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:58 PM2024-07-30T18:58:02+5:302024-07-30T19:05:47+5:30
तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले
आळंदी : पावसाच्या सरी... टाळ - मृदंगाचा निनाद...."माउली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर.... रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले.
माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून "सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी" या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माउलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माउलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक - श्रीविष्णू मंदिर - श्रीराम मंदिर - हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणा मंडपात पालखी स्थिरावली.
आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले#pune#alandi#ashadhiwari#santdnyaneshwarmaharajpic.twitter.com/C0stHj1RsA
— Lokmat (@lokmat) July 30, 2024
पालखीतील 'श्रीं'च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे 'श्रीं'ना 'पिठलं - भाकरीचा' महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्यावतीने पिठलं- भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली.
तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर माऊलींची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले#pune#ashadhiwari#santdnyaneshwarmaharaj#alandipic.twitter.com/9fupBTDrMb
— Lokmat (@lokmat) July 30, 2024
भाविकांची गर्दी...
माउलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी भर पावसात स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे तसेच शहरातील अन्य शाळांमधील विद्यार्थी व भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला.