"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:49 AM2024-07-03T09:49:25+5:302024-07-03T09:50:38+5:30

माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे...

sant dnyaneshwar Mauli's palkhi sohla in Saswad after a 15 hour journey dive ghat | "हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

पुणे :

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥

नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ॥

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी देवाकडे घातलेल्या याच मागणीचा भाव मनी बाळगून लाखाे वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सुमारे साडेदहाच्या सुमारास हडपसरमध्ये आगमन झाले. तासाभराच्या विश्रांतीनंतर माउलींनी दिवे घाटाकडे प्रस्थान ठेवले. हडपसर, गोंधळेनगर, सातववाडी, तुकाई दर्शन, फुरसुंगी, उरळी देवाची, वडकी येथील ग्रामस्थांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती.

हडपसरवरून पालखी मार्गस्थ हाेत असताना वरुण राजानेही हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला हाेता. त्यानंतर ऊन-सावलीच्या खेळाने घामाच्या धारादेखील निघत होत्या. ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने वारकरी भारावून जात होते. दोन वाजण्याच्या सुमारास माउलींनी दुपारचा विसावा उरळी देवाची इथे ठेवला. एकादशी असल्याने वारकऱ्यांनी फराळाचा आस्वाद घेत तासाभराच्या विश्रांतीनंतर घाटाच्या पायथ्याकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. पायथ्याशी पोहोचण्यापूर्वी वरुण राजाने आणखीन एकदा हजेरी लावली. त्यामुळे घाटापर्यंतची वाट आणखीन सुखकर झाली.

दिवे घाटाच्या नागमोडी वळणाचा प्रवास करण्यापूर्वी माउलींची पालखी वडकी नाला येथे सुमारे पावणेचारला पोहोचली. एक तासाची विश्रांती घेतल्यानंतर अवघड असा दिवेघाट चढण्यास सुरुवात झाली. यावेळी माउलींच्या रथाला वडकी नाला येथे तयार असलेल्या दोन बैलजोड्या लावण्यात आल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली. रथापुढील दिंडी क्रमांक १७ने या नामस्मरणावर कळस केला. श्रीकृष्णाच्या गवळणींचा नाद करत फुगड्या घालत उपस्थित वारकरी तसेच भाविकांना मंत्रमुग्ध केले. सुमारे पाच किलोमीटरचा हा घाट मार्गक्रमण करत असताना या दिंडीने पायथ्यापासून घाट संपेपर्यंत गवळणींचाच नाद सादर केला. अन्य दिंड्यांनी माउलींच्या जयघोषात हा घाट पार केला.

गाठीभेटींची ही वारी

विठुरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत असतात याच वारीत हीच वारी अनेकांसाठी भेटीगाठीची वारी असते. कोल्हापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ वारकरी आपल्या नातवांच्या अनपेक्षित भेटीने भारावून गेले. अनेक वर्षांनी भेटलेल्या नातवांना पाहून त्यांचे डोळेही पाणावले. तोंडावरून हात फिरवत माउलींमुळेच हा योगायोग आल्याची भावना व्यक्त केली.

५०० ते ६०० वासुदेव

वारीत वारकऱ्यांप्रमाणेच वासुदेवदेखील सामील झाले आहेत. यांची संख्या सुमारे ५०० ते ६०० असल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील असाच एक वासुदेव भेटला. वडिलांची वारीची परंपरा तो कायम ठेवत आहे. लहान असल्याकारणाने वडील गेल्यानंतर त्याने वारी केली नाही मात्र गेल्या सहा वर्षांपासून तो सलग वारी करतोय. वारीची परंपरा जोपासताना अनेक भाविक आणि वारकरी त्याला काही पैसेही देतात, त्यातून त्याचे अर्थार्जन होत असल्याचे त्याने सांगितले.

हडपसरनंतर चार विसावे :

हडपसरमधील विसावा संपल्यानंतर माउलींचा विसावा उरुळी देवाची येथे असतो. येथे दुपारचे जेवण घेतले जाते. त्यानंतर वडकी नाला येथे विसावा असतो. घाट पार केल्यानंतर पुन्हा दिवेघाटावर माउलींचा विसावा असतो आणि सासवडला पोहोचण्यापूर्वी पवारवाडी येथे चौथा विसावा असतो. प्रत्येक ठिकाणी किमान पाऊण ते एक तास वेळ विश्रांतीसाठी घेतला जात असल्याने पुणे ते सासवड हे अंतर कापण्यासाठी माउलींना किमान १५ ते १६ तास लागले.

Web Title: sant dnyaneshwar Mauli's palkhi sohla in Saswad after a 15 hour journey dive ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.