Aashadhi Vaari | यंदा माऊलींच्या रथासाठी भोसले कुटुंबियांना बैलजोडीला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:52 AM2023-04-29T11:52:59+5:302023-04-29T11:56:04+5:30
माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा ११ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे...
आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यातील रथासाठी आळंदीतील भोसले घराण्यातील बैलजोडीला रथ ओढण्याचा मान देण्यात आला आहे. माऊलींच्या रथासाठी बैलजोडीचा मान कुऱ्हाडे, रानवडे, भोसले, वाहिले, घुंडरे या अलंकापुरीतील ग्रामस्थांना दिला जातो.
माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा ११ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर बैलजोडी निवड समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत आळंदीतील प्रगतशील शेतकरी तुळशीराम भोसले व रोहीत भोसले यांना बैलजोडी जुंपण्याचा मान देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
याप्रसंगी बैलजोडी समितीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, रामदास भोसले, माऊली वहीले, उपनगराध्यक्ष सागर भोसले, पांडुरंग भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, रोहित भोसले आदिंसह भोसले परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान तुळशीराम भोसले यांना बैलजोडीचा मान मिळाल्याने देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी शाल श्रीफळ देवून सन्मान केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडीचा मान मिळाल्याने भोसले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.