नामाचिये बळे पार केला दिवे घाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 08:41 PM2018-07-09T20:41:50+5:302018-07-09T20:48:45+5:30

पंढरीच्या वाटेवरचा सर्वात अवघड टप्पा...निसर्गाने मुक्तहस्ते केलेली हिरवळीची उधळण...कोसळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी.सोबतीला हरिनामाचा अखंड गजर... अशा भक्तिमय वातावरणात पालखीने सायंकाळीसाडेचार किलोमीटरचा नागमोडी वळणाचा दिवेघाट सर झाला..

sant dnyneshwar maharaj palkhi sohla in saswad | नामाचिये बळे पार केला दिवे घाट....

नामाचिये बळे पार केला दिवे घाट....

googlenewsNext
ठळक मुद्देमाऊलींचा पालखीसोहळा सासवडनगरीत विसावला : संत तुकाराम महाराजांचा लोणी काळभोरला मुक्काम

सासवड :  ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलयापार केला. चांगल्या पावसाने घाटात रंगलेल्या हिरवाईच्या दर्शनाने जलधारा अंगावर घेताना वारकऱ्यांचा थकवा पळून गेला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला.
‘विठ्ठल नावाचा लागलासे छंद, पुण्यनगरीत अवघा आनंद’ म्हणत शनिवार आणि रविवारचा दिवस वारकऱ्यांनी विश्रांती घेतली. परंतु, सोमवारी पालखीसोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा होता. पण सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढही होती. त्यामुळे सकाळी साडेसहा वाजताच पालखीने सासरवडच्या दिशेने प्रस्थान  केले. हडपसर येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले. 
तत्पूर्वी पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला. तुकोबारायांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहचली तर ज्ञानोबा माऊलींची पालखी दिवे घाटातून संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली. 
पुरंदरच्या भूमीत संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दुपारी पाच वाजता दाखल झाला. पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक आज (९ जुलै) माऊलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. प्रत्यक्ष घाटाची चढण सुरू झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या पाच बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. दुपारी ५ वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला. 
माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली. घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांत साठवला. माऊलीनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही वेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारकऱ्यांनी घाटमाथ्यावर काही वेळ विश्रांती घेतली. 
पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची, पाणीपुरवठ्याची सोय केलेली आहे.
सासवड नगरपालिकेच्या वतीने चंदन टेकडी येथे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, अजित जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक, सुहास बापू लांडगे, इतर नगरसेवक तसेच पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पालखीने सासवड शहरात प्रवेश केल्यावर सोपाननगर कमानीजवळ पुरंदर तालुका कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, अनिल उरवणे, चंद्रशेखर जगताप, विश्वजित आनंदे आदी उपस्थित होते. दिवे घाटापासून सासवडमध्ये  प्रवेश करताना रिमझिम पावसाने हजेरी लावली.
सासवड येथील पालखीतळावर विजेचे दिवे, तंबूजवळ फ्लड लाईट, जनरेटर, भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारी असून त्यासाठी स्वयंसेविका नेमल्या आहेत. 

Web Title: sant dnyneshwar maharaj palkhi sohla in saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.