व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:03 PM2018-08-08T15:03:51+5:302018-08-08T15:04:51+5:30
सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा काय उपयोग ? : प्रतिभाताई पाटील
पुणे : सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा उपयोग नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहेत. संतांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. देशातील गरिबी हटवण्यासाठी, देश व्यसनमुक्त करण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठान व सुमंतजी महाराज नलावडे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समिती यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील अध्वर्यु व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कीर्तनकार भागवताचार्य गुरुवर्य सुमंतजीमहाराज नलावडे (ओतुरकर) यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आणि मीराबाई सुमंतमहाराज नलावडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी मारुती महाराज कु-हेकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, बालयोगी सदानंद महाराज, माजी आमदार उल्हास पवार, शरद सोनावणे, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, अतुल बेनके, उर्मिला विश्वनाथ कराड, चंद्रकांत महाराज वांजळे, संभाजी खोमणे, महेश महाराज नलावडे, प्रा.सागर शेडगे, अनंत सुतार उपस्थित होते.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना सन १९७४ ते १९७५ च्या सुमारास भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळेला सरकारने दुष्काळासाठी योजना राबविली होती. शेतात काम करणा-या मजुराला रोजच्या कमाईपेक्षा जास्त पैसे मिळत होते. परंतु त्यातील ५० टक्के लोक ते पैसे व्यसनांसाठी खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले. गरिबी हटवण्यासाठी सरकारी योजनेचा काहीच उपयोग होत नव्हता.’
मारुती महाराज कु-हेकर म्हणाले, ‘भारत ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेली अध्यात्माची देणगी पुढे नेण्याचे काम सुमंत महाराज करत आहेत. संतांचा हा वारसा चालवणा-या लोकांची समाजाला गरज आहे.
चंद्रकांत वांजळे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र नलावडे यांनी आभार मानले.