पुण्यनगरी झाली माऊलीमय, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 05:04 PM2018-07-08T17:04:39+5:302018-07-08T17:04:45+5:30
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे.
पुणे :संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे. विठुरायाच्या दर्शनाकरिता मैलोन मैल चा प्रवास करुन पंढरीकडे निघालेल्या वारकरी भक्त काही काळ विश्रांतीकरिता पुण्यात थांबले आहेत. वारकरी बांधवांनी पुण्यात विश्रांती घेतली की त्यानंतर त्यांच्या सेवेत पुणेकर आनंदाने सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. याप्रसंगी कुणी त्यांचे पाय चेपून दिले , कुणी हातापायांना मालिश केली. जमेल तितकी सेवा करुन विठ्ठ्ल दर्शनाचा लाभ त्या सेवेतून घ्यायचा. असा त्या सेवेमागील उद्देश साधून सेवेकरिता शहरातील विविध संघटना, सेवा भावी संघ, गणेश मंडळे, प्रतिष्ठान गर्दी केली.याशिवाय आजूबाजूच्या घरातून पिठलं भाकरीच्या पंक्तीसाठी आमंत्रणे करण्यात आली.
बाजारपेठांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहवयास मिळत आहे.रस्त्याच्या दुतर्फा खरेदीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. फेरीवाल्यांची जागा मिळविण्यासाठी धडपड सुरु असून याबरोबरच प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी कुठलीही अडचण होवू नये, रांगेत अनुउचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे भाविकांचा गोंधळ होवू नये यासाठी रांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पावसाची खबरदारी घेवून निवा-यासाठी मोठमोठे मंडप टाकण्यात आल्याने भाविकांसाठी सुरक्षित निवारा तयार झाला आहे. पत्ता चुकणा-यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. विशेषत: या सर्व मदत कार्यात विविध महाविद्यालये, त्यातील एनएसएस, एनसीसी, याबरोबरच मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत.
राजकीय सेलिब्रिटींची मांदियाळी
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सामान्य पुणेकरांसह या सेलिब्रिटी दर्शनामुळे पोलिसांची तारांबळ उडालेली बघायला मिळाली.