पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांचा संत तुकाराम पुरस्कार‘आनंदी गोपाळ’ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:42 PM2020-01-17T12:42:44+5:302020-01-17T12:48:35+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने या वर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ट्यूनिशियनच्या ‘अ सन’ या चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’वर आपले नाव कोरले.
गेल्या आठवडाभरापासून देश-विदेशातील विविध चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या ‘पिफ’चा दिमाखदार सांगता सोहळा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगला. ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह, तर ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप सन्मानपत्र, रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.
सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाने परीक्षकांचा पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ तसेच सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमेटोग्राफी (छायाचित्रण) व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार आदी विविध पुरस्कारांमध्ये बाजी मारली. याबरोबरच प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने ‘सुपरनोवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक बर्तोज कृहलिक यांना गौरविण्यात आले. रोख रुपये ५ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘अ सन’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (आॅडियन्स अवॉर्ड) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, प्रसिद्ध ध्वनिदिग्दर्शक व ध्वनिडिझायनर बिश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे, डॉ. मोहन आगाशे यांसह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले परीक्षक यांबरोबरच एमआयटी-एटीडीच्या डॉ. सुनीता कराड आदी उपस्थित होते.
दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावर्षी अजित वाडीकर (वाय) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुक्ता बर्वे (वाय) यांना, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार नियाज मुजावर (तुझ्या आईला) यांना तर सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पुरस्कार विजय मिश्रा (तुझ्या आईला) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याशिवाय सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ व मेहडी बरसौई दिग्दर्शित ‘अ सन’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (आॅडियन्स अवॉर्ड) पुरस्कार देत गौरविण्यात आले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या वतीने या वर्षीपासून ‘एमआयटी- एसएफटी ‘मन स्पिरिट’ पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षी ‘मार्केट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप कुरबाह यांना हा पुरस्कार एमआयटी-एटीडीच्या डॉ. सुनीता कराड यांच्या हस्ते देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत पटकथा लेखनाचा परीक्षक विशेष पुरस्कार मायकल इडोव (द ह्युमरिस्ट) यांना देण्यात आला तर परीक्षक विशेष प्रमाणपत्र ‘मारिघेल्ला’ चित्रपटाला देण्यात आले.
........
’पिफ’ बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो. या महोत्सवामध्ये आपला चित्रपट सादर व्हावा आणि त्याला पुरस्कार मिळावा अशी खूप इच्छा होती. पण पुरस्कार मिळेल असे कधी वाटले नव्हते. ती इच्छा आज पूर्ण झाली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या खूप भावनात्मक प्रतिक्रिया होत्या. लोकांनी आम्हाला काय वाटते ते लिहून पाठवले. आनंदीबार्इंचा प्रवास त्यांना माहिती नव्हता. तो त्यांना बघायला मिळाला. १३0 ते १४0 वर्षांपूर्वीची ही घटना आजही सुसंगत वाटते. थोडीशी खंत अन् थोडीशी प्रेरणादायी असलेल्या या कथेशी प्रेक्षक कनेक्ट झाले. - समीर विद्वांस, दिग्दर्शक
...........
विद्यार्थी लघुपट पुरस्कार
* बेस्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट पुरस्कार ( अ पीस ऑफ होप-दिग्दर्शक स्याहरेझा फाहलेवी)
* बेस्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट दिग्दर्शक पुरस्कार अलीरेझा घासेमी
*अॅनिमेशन लघुपट पुरस्कार मझाईक्स आर्क
* स्टीप्स ऑफ खजर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - चित्रपट स्टीप्स ऑफ खजर (दिग्दर्शक सोफिया मेलनेक)
* आदिवासी लघुपट पुरस्कार
’द माइटी गोंट्स ब्रिक्स आॅफ चंदागड’- विप्लव शिंदे
४’पडकाई’ -अमर मेलगिरी
४’रानी बेटी’- धर्मा वानखेडे