Ashadhi Wari: पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 03:34 PM2024-07-02T15:34:42+5:302024-07-02T15:35:05+5:30
Ashadhi Wari- वैष्णवांच्या सोहळ्यात वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
वानवडी : श्रीमंत सरदार महादजी शिंदेचा वारसा लाभलेल्या व वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखींचे (Sant Tukaram Maharaj palkhi) श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पावनभुमीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. (Ashadhi Wari)
वानवडी भैरोबानाला चौक येथील पहिल्या मानाच्या आरतीसह जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ (व्हिडिओ - प्रमोद गव्हाणे)#Pune#ashadhiwari#santtukarammaharajpalkhisohlapic.twitter.com/H8FIbN9nMq
— Lokmat (@lokmat) July 2, 2024
वानवडीत भैरोबानाला चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे सकाळी ७.३० वा आगमन झाले. माऊलींच्या पालखी मध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेच्या पादुका ठेवून परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली. आरती सुरु होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला. आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, ह.भ.प.श्री. बाळासाहेब गव्हाणे व श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी असलेल्या सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. आरती होऊन माऊलींची पालखी हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी, भैरोबानाला येथे सकाळी ९.१५ वा. आगमन झाले. वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे आरती घेण्यात आली व वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी भजन व ग्यानबा तुकाराम मुखी ठेवून हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पालीखीसोहळ्यात वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वैष्णवांच्या सोहळ्यात वानवडी भैरोबानाला चौक येथील पहिल्या मानाच्या आरतीसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ (व्हिडिओ - प्रमोद गव्हाणे)#Pune#ashadhiwari#santdnyaneshwarmaharajpalkhipic.twitter.com/lbkC5Ss0fM
— Lokmat (@lokmat) July 2, 2024
सुरुवातीला पालख्या जात होत्या श्रीमंत सरदार महादजी शिंदे छत्री मार्गे...
आळंदी ते पंढरपूर पर्यंत असणाऱ्या वारी सोहळ्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. वानवडी मध्ये महादजी शिंदे महाराज यांची समाधी असून सुरुवातीला पालख्या खांद्यावर घेऊन यांची समाधी असलेल्या व शिंदे छत्री म्हणुन नावारुपाला आलेल्या मंदिराकडे आरती होऊन पुढे मार्गस्थ होत होत्या. परंतु कालांतराने वारी सोहळ्यातील वैष्णवांचा जनसमुदाय वाढत गेला व गावातील रस्ते लहान पडत गेले आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी रथात ठेवून भैरोबानाला मार्गे हडपसर च्या दिशेने पंढरपूरला जाण्यास सुरुवात झाली.