संत तुकाराम महाराज बीज सोहळा रद्द, संस्थानचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:35 PM2021-03-16T15:35:33+5:302021-03-16T15:37:31+5:30
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याची परवानगी मिळावी अशी संस्थानची मागणी
देहूगाव : राज्यातील व जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता यंदा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासंदर्भात चर्चा होऊन शासन ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणेच संस्थान बीजोत्सव सोहळ्याचे आयोजन करणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर हा सोहळ्याच्या आयोजनाबाबतचा निर्णय होणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सकारात्मक भूमिका घेत संमती दर्शविली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिली. दरम्यानच्या काळात आज मंगळवारी ( दि. 16 ) दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासक मधुसुधन बर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बीज सोहळा रद्द करण्यासंदर्भात प्रस्तावही सादर केला आहे. संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवाच्या तयारीची पहिली आढावा बैठकीचे आयोजन हवेलीचे प्रांत सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड व तीर्थक्षेत्र देहूनगरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तुकाराम बीज सोहळ्याचे नियोजन करण्यासंदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय कोणताही निर्णय संस्थानला घेता येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बीजोत्सवाचा कार्यक्रम निश्चित करता येणार आहे. यंदा बीजोत्सव होणार आहे किंवा नाही याबाबत राज्यभरातील दिंड्या व फडकरी संस्थानकडे वारंवार चौकशी करत आहेत. म्हणून याबाबत निर्णय होणे अपेक्षित असल्याने ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसिलदार गीता गायकवाड, देहूगाव नगरपंचायतीचे प्रशासक व मावळचे तहसिलदार मधुसुधन बर्गे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास सोंडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर आदी उपस्थित होते.
गतवर्षी देहू परिसरात पहिला कोविडचा रुग्ण आढळला होता. यंदाही देहूगाव मध्ये सहा सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून सध्या गावात कोविडचे सकारात्मक 32 रुग्ण असून 17 जण गृहविलगीकरणात आहेत. जर बीज सोहळा संपन्न झाला तर येणारे यात्रेकरू दर्शन घेताना आजुबाजुला स्पर्श करणार, शिंकणार, खोकणार यामध्ये जर कोणी सकारात्मक रुग्ण असतील तर यामुळे कोरोनाचा राज्यभर प्रसार झपाट्याने होऊ शकतो यासाठी हा सोहळा रद्द करण्यात यावा असे मत डॉ. किशोर यादव यांनी व्यक्त केले. यावर उपस्थितांचे एकमकत झाले.
यानुसार श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याची तयारी कशा प्रकारे झाली आहे याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर प्रशासक बर्गे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना तुकाराम बीज यात्रा रद्द करण्या संदर्भात प्रस्ताव सादर केला. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बारवकर यांनी दिली. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येणार असून सर्व भाविकांना म्हणून भाविकांनी गावात येऊ नये, भाविकांनी आपआपल्या गावातच बीजोत्सव साजरा करावा असे अवाहन प्रशासनाच्या व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
परवानगी मिळालेल्या त्या प्रत्येकाला ओळखपत्र देण्यात येणार आहे. यात्रेच्या काळात गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गावात येणारे सर्व रस्त्यांवर 28 मार्च रात्री 12 वाजल्यापासुन ते 31 मार्च रात्री बारा वाजेपर्यंत शिवजयंती उत्सव असल्याने 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली आहे.