Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 03:34 PM2024-07-12T15:34:14+5:302024-07-12T15:34:40+5:30
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ
बावडा (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) आज (दि. १२ जुलै) पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. सराटी गावी मुक्काम असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अकलूज दिशेने प्रस्थान ठेवण्यापूर्वी आज नीरा नदीच्या सराटी येथील घाटावर तुकोबांच्या पादुकांचे फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. यावेळी तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे यांच्या व विश्वस्तांच्या हस्ते स्नान घालण्यात आले. (Ashadhi Wari)
तत्पूर्वी सराटी येथे पालखी आगमनापूर्वी इंदापूर वरून काल (दि. ११ जुलै) रोजी विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड गावात ग्रामस्थ ग्रामपंचायत वतीने पालखीचे दिमाखात स्वागत केले. सुरवड येथे देहू संस्थानच्या पदाधिकारी यांचा सन्मान प्रसाशक युनूस शेख, ग्रामसेवक भोसले यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर पालखी सोहळा वै. शेरकर महाराज समाधी स्थळापासून वकीलवस्ती येथे काही काळ थांबला. पुढे बावडा गावाच्या वेशीवर गेल्यावर पालखीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कुटुंबीयांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यानंतर बावडा बाजार तळ या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दर्शन रांगेत दर्शन घेत होते पुढे बावडा येथून पालखी सराटीकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी पादुकाचे सराटी येथील परंपरागत नीरा स्नानाला महत्त्व आहे. देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यासह देहू संस्थांचे पदाधिकारी चोपदार,टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक, झेंडेवाले, तुळशीवाल्या महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठी वसलेले सराटी गाव पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यावर वसलेले असल्याने सकाळी निरास्नान आटोपल्यानंतर ८ वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ झाली.