Ashadhi Wari: तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला विसावला; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:15 PM2023-06-14T20:15:27+5:302023-06-14T20:16:50+5:30

हडपसरमध्ये पालखीचे आगमन होताच चौकाचौकांत डॉल्बी लावून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते...

sant tukaram maharaj palkhi ceremony rested on the lonikalbhor Palkhi welcomed by villagers | Ashadhi Wari: तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला विसावला; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

Ashadhi Wari: तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला विसावला; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

googlenewsNext

- रोशन मोरे

लोणी काळभोर (पुणे) : सकाळी गारवा तर दिवसभर उन्हाच्या झळा सोसत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास लोणीकाळभोरच्या विठ्ठल मंदिरात विसावला. गेल्या वर्षी पालखी तळावर पाणी भरल्याने यंदा पालखी लोणी काळभोरमध्ये मुक्काम करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र, सरकारच्या यशस्वी मध्यस्थीने यंदा पालखी लोणीकाळभोरमध्ये मुक्कामी गेली. त्यामुळे लोणीकाळभोर ग्रामस्थांनी जल्लोष केला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवार (दि.१२) आणि मंगळवारी (दि.१३) असे दोन दिवस पुण्यात मुक्काम केला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा बुधवारी सकाळी सात वाजता लोणीकाळभोरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्याने सकाळचा गारवा आणि ढगाळ वातावरणात पहिला विसावा हडपसरमध्ये घेतला. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला.

वाढत्या उन्हासोबत वारकरी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोष करीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कदमवाक वस्ती येथे दाखल झाला. हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, सरपंच चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच राजश्री काळभोर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी पालखीचे स्वागत केले. पालखीचे आगमन होताच तुतारीचा निनाद करण्यात आला. सहज सोपा वाटणारा पुणे-हडपसर हा पहिला टप्पा वाढत्या उन्हाने वारकऱ्यांची परीक्षा पाहत होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. दुपारचा विसावा पालखीने बाराच्या सुमारास घेतला.

डॉल्बी लावून स्वागत

हडपसरमध्ये पालखीचे आगमन होताच चौकाचौकांत डॉल्बी लावून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी विठूनामाचा गजर सुरू होता. उन्हाची तीव्रता पाहून वारकऱ्यांना पाण्याचे वाटप करण्यात येत होते.

फराळाची व्यवस्था

बुधवारी एकादशी असल्याने वारकऱ्यांना स्वयंसेवी संस्था, मंडळांकडून फराळाचे वाटप करण्यात येत होते. ‘माउली फराळ करून जावा’, अशी प्रेमाची हाक पालखी मार्गावरील नागरिक वारकऱ्यांना देत होते. तसेच ठिकठिकाणी वारकऱ्यांना राजगिऱ्याची चिक्की, लाडूचे वाटप करण्यात येत होते.

झाडांच्या सावलीचा आधार

हडपसरवरून पालखी लोणीकाळभोर मुक्कामासाठी पुणे-सोलापूर महामार्गावरून मार्गस्थ झाली असता दिंड्या आपल्या क्रमाने पुढे जात होत्या. दुपारी ऊन सावल्यांचा खेळ बंद होऊन कडक ऊन पडले होते. उन्हाने तापलेल्या महामार्गावरून जाताना घामाच्या धारात वारकरी ओले चिंब होत होते. हडपसर सोडल्यावर लोणी काळभोरजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांखाली वारकरी विसावा घेत पुढे जात होते.

Web Title: sant tukaram maharaj palkhi ceremony rested on the lonikalbhor Palkhi welcomed by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.