संत तुकाराममहाराज पालखी ८ जुलैला
By admin | Published: May 14, 2015 04:25 AM2015-05-14T04:25:40+5:302015-05-14T04:25:40+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे ८ जुलैला दुपारी येथून प्रस्थान होणार आहे.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे ८ जुलैला दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. तब्बल १९ दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला २६ जुलैला दाखल होणार आहे.
संत तुकाराममहाराजांची
पालखी ३१ जुलैपर्यंत पंढरपुरातील श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रदक्षिणा मार्ग येथे मुक्कामास असणार आहे. पालखी ११ दिवसांचा परतीचा प्रवास करून १० आॅगस्टला परतणार आहे.
दि. ८ जुलै रोजी प्रस्थान सोहळ्याला दुपारी अडीचच्या सुमारास सुरुवात होणार असून, पहिला मुक्काम मुख्य मंदिराशेजारील इनामदार वाड्यात होणार आहे. दि. ९ जुलैला पालखी इनामदारवाड्यातून सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आकुर्डीकडे निघेल.
१० जुलैला पालखी आकुर्डी येथून निघून पुण्याकडे निघेल. तेथे रात्रीच्या मुक्कामासाठी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पोहोचेल. तेथे ११ जुलैला पालखी दिवस भर मुक्कामी असणार आहे. पालखी १२ जुलैला लोणी काळभोर, १३ जुलैला यवत, १४ जुलैला वरवंड, १५ जुलैला उंडवडी गवळ्याची, १६ जुलैला बारामती सांस्कृतिक भवन, १७ जुलैला सणसर, १८ जुलैला अंथुर्णे, १९ जुलैला निमगाव केतकी, २० जुलैला इंदापूर, २१ जुलैला सराटी, २२ जुलैला अकलुज, २३ जुलैला बोरगाव, २४ जुलै पिराची कुरोली, २५ जुलैला वाखरी येथे मुक्कामी असेल. २६ जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल. येथे पालखी ३१ जुलै दुपारपर्यंत मुक्काम असेल.(वार्ताहर)