Ashadhi Wari: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी; फुलांचा वर्षाव करीत स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 09:00 PM2023-06-15T21:00:09+5:302023-06-15T21:02:51+5:30
बोरीभडक येथे दौंड तालुक्यात पालखीचे आगमन होताच फुलांचा वर्षाव करीत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले...
यवत (पुणे) : विठुरायाच्या नामस्मरणात दंग झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्याच्या सीमेवर फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही मजल-दरमजल करीत पालखी सोहळा लोणी काळभोर ते यवत हा मोठा टप्पा पार करीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला.
बोरीभडक येथे दौंड तालुक्यात पालखीचे आगमन होताच फुलांचा वर्षाव करीत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, भाजपा महिला मोर्चाच्या कांचन कूल, नितीन दोरगे, बोरीभडकच्या सरपंच कविता कोळपे, उपसरपंच प्रवीण खेडेकर, महादेव यादव, रामभाऊ चौधरी, कुंडलिक खुटवड, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, स्वप्निल जाधव, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, संतोष आखाडे, अशोक फरगडे, बोरीऐंदी सरपंच सविता मंगेश भोसेकर, विकास आतकिरे मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतल्यानंतर काही मिनिटांत सोहळा मार्गस्थ झाला. दौंड राष्ट्रवादीचे युवा नेते तुषार थोरात यांनी काहीकाळ पालखी रथाचे सारथ्य केले. यानंतर ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गालगत भाविकांनी गर्दी केली होती. सहजपूर ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यानंतर साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा जाऊजीबुवाची वाडी येथे विसाव्यासाठी थांबला. यानंतर कासुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्री टेकवडे, उपसरपंच दिलीप आखाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे, बाळासाहेब टेकवडे, वाल्मीक आखाडे, मयूर आखाडे, आदी ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
रात्री आठ नंतर पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचला. यानंतर मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर पिठले-भाकरीचे भोजन देण्यात आले. रात्री म्हातारबाबा पाथरूडकर यांचे कीर्तन झाले. यवत मुक्कामी ग्रामपंचायत, सर्व शासकीय विभाग व ग्रामस्थांनी सर्व सोयीसुविधा सज्ज ठेवल्या होत्या.