Ashadhi Wari 2022: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांचे स्वागत; पालखी वरवंडला मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:07 PM2022-06-26T19:07:07+5:302022-06-26T19:07:19+5:30
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व दोन वर्षे कालावधीनंतर वरवंड मध्ये यंदाचा पालखी सोहळ्याचा स्वागताचा जल्लोष मोठ्या उत्साहात
वरवंड : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व दोन वर्षे कालावधीनंतर वरवंड मध्ये यंदाचा पालखी सोहळ्याचा स्वागताचा जल्लोष मोठ्या उत्साहात होता. परंपरेनुसार वरवंडमध्ये पालखी सोहळा दाखल झाला की कायमच पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी वरून राजाने लावली हजेरी आहे. यामुळे वारकरी ग्रामस्थ सुखावले
सकाळी वारकरी गावात येऊ लागल्या पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पावसाने लावलेली हजेरी तसेच सायंकाळी टाळ मृदगांचा गजरात विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वरवंड नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचा स्वागतसाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा केल्या होत्या.
ग्रामस्थांनी यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या पालखी सोहळ्याचे आगमन सायंकाळी 6.00 वाजता वरवंड नगरीत झाले. पालखी येणार असल्यामुळे स्वागतासाठी स्वागत कमानी रांगोळीचा पायघड्या तसेच पालखी सोहळ्याचा स्वागतासाठी ग्रामस्थांनी घरासमोर रागोळी काढण्यात आल्या होत्या. पालखी नवीन विठ्ठल मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवे झेंडे घेतलेल्या वारकऱ्यांनी मंदिराला रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वतःचा खांध्यावर उचलून घेऊन मंदिरा मध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आल्यानंतर नेवैद्य दाखवण्यात आला. विणेकरी यांनी दर्शन घेतल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले दर्शन रांगेत महिला व पुरुष स्वतंत्र रांगा केल्या होत्या. मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
या पालखी सोहळ्याचे जेवणाची सोय ग्रामस्थांनी वस्तीगृहच्या मैदानात करण्यात आली होती. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवीन विठ्ठल मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या सोहळ्यात स्वच्छतेचे संदेश, निर्मल वारी, निर्मल ग्राम, शेतकरी वाचवा, झाडे लावा झाडे वाचवा असे फलक लावण्यात आले होते. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने मंदीराचा परिसरात कोरोना तपासणी केंद्र ठेवण्यात आले होते तसेच प्रशासनाचा वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.