संत तुकारामांची पालखी यवत मुक्कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 03:11 AM2018-07-11T03:11:54+5:302018-07-11T03:12:09+5:30

विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेला संत तुकाराममहाराज पालखी सोहळा वारीतील सहाव्या मुक्कामी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला.

Sant Tukaram's Palkhi In Yavat | संत तुकारामांची पालखी यवत मुक्कामी

संत तुकारामांची पालखी यवत मुक्कामी

googlenewsNext

यवत : पंढरीची वारी आल्याने संसारा
दिनांचा सोयरा पांडुरंग
वाट पाहतो उभा, भेटीची आवडी
कृपाळू तातडो उतावेळा....
विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेला संत तुकाराममहाराज पालखी सोहळा वारीतील सहाव्या मुक्कामी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. यावेळी गावाच्या वेशीवर यवत ग्रामस्थांनी भक्तिभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखी सोहळा मंदिरात विसावल्यानंतर परंपरेप्रमाणे यवतकरांनी चुलीवरील भाकरी व पिठल्याचे भोजन वारकऱ्यांना दिले. ग्रामस्थांनी तब्बल एक लाख भाकरी व एक हजार पाचशे किलोचे बेसनाचे पिठले बनविले होते. पिठले भाकरीच्या जेवणाची येथील परंपरा अनेक वर्षे जुनी आहे.
लोणी-काळभोर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने सकाळी प्रस्थान केले. पंढरीच्या वाटेवरील लोणी ते यवतदरम्यान २८ किलोमीटरचा मार्ग सर्वात मोठा टप्पा आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत लोणी ते उरुळीकांचनदरम्यानरिमझिम पाऊस अंगावर झेलत व उरुळी ते यवतदरम्यान ऊन-सावलीच्या खेळात पालखी सोहळा पुढे जात होता.
सकाळी लोणी येथून निघाल्यानंतर कुंजीरवाडी फाटा येथे पहिली विश्रांती घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी थांबली होती. दुपारचा विसावा संपल्यानंतर पालखी सोहळ्याने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात प्रवेश केला. मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी तालुक्याच्या वेशीवर पालखी सोहळा आल्यानंतर पालखीच्या रथाचे सारथ्य केले, तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, सरपंच बाबूराव गाजशिवे, उपसरपंच विकास आतकिरे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी पालखीचे विधिवत पूजन करीत स्वागत केले.

पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केल्यानंतर दुपारपर्यंत पडणारा रिमझिम पाऊस थांबल्याचे चित्र होते. यानंतर ऊन-सावलीच्या खेळात पुणे-सोलापूर महामार्गावर भक्तीचा सागर आल्याचे दिसून येत होते. सहजपूर फाटा, जावजीबुवाचीवाडी, कासुर्डी फाटा येथे पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जावजीबुवाचीवाडी येथे पालखी सोहळा विसाव्यासाठी अर्धा तास थांबला होता. यानंतर मजल-दरमजल करीत पालखी सोहळा आठ वाजण्याच्या सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्कामाच्या विसाव्यासाठी पोहोचला. बुधवारी सकाळी पालखी सोहळा यवतमधून प्रस्थान करून वरवंड मुक्कामी विसावणार आहे.

असा झाला आजचा प्रवास


लोणी काळभोर : येथील मुक्काम उरकून सकाळी संत तुकोबारायांची पालखी कुंजीरवाडीमध्ये दाखल झाली. सोहळ्याच्या स्वागतासाठी थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, पेठ, सोरतापवाडी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. वारकºयांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सकाळी ७ पासूनच थेऊरफाटा ते सोरतापवाडी महामार्गालगत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याच ठिकाणी परिसरातील सर्व गावातील दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्या. प्रत्येकाने जसे जमेल त्या पद्धतीने सेवा केली.
थेऊर फाटा : येथे महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, ग्रामपंचायत थेऊर सरपंच नंंदा कुंजीर, उपसरपंच आप्पासाहेब काळे, गटविकास अधिकारी मुरलीधर बडे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, संदीप धुमाळ, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गायकवाड आदी मान्यवरांनी स्वागत केले. या ठिकाणी राईज अँड शाईन बायोटेकच्यावतीने एक टेम्पो केळी व श्रीनाथ पतसंस्थेच्यावतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी दिंडीतील विणेकºयांना छत्रीवाटप केले. परीस फाऊंडेशनच्यावतीने ५०० कापडी पिशव्या वाटल्या.
कुंजीरवाडी : येथे सोहळा आला त्यावेळी सरपंच अनुराधा कुंजीर, उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, ग्रामविकास अधिकारी गळवे, तंटामुक्ती
समिती अध्यक्ष संतोष कुंजीर, पोलीसपाटील मिलिंद कुंजीर
यांनी स्वागत केले. सोहळा नायगाव फाटा येथे आला. त्यावेळी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती सपना वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप वाल्हेकर, आळंदी म्हातोबाची उपसरपंच मोहन जवळकर, सहकारी सोसायटीचे चेअरमन गणपत जवळकर, अशोक जवळकर, भगवान जवळकर यांनी स्वागत केले.
पेठ फाटा येथे ‘यशवंत’चे माजी संचालक रघुनाथ चौधरी, सरपंच कमल शेलार, उपसरपंच अर्जुन चौधरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील गायकवाड व इतरांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करून सोहळा उरुळीकांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी रवाना झाला.

Web Title: Sant Tukaram's Palkhi In Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.