Christmas Days: गिफ्टचा वर्षाव करणारा सांताक्लॉज आता चक्क भाड्याने मिळणार; रोजगाराची नवी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 11:18 AM2021-12-22T11:18:55+5:302021-12-22T11:37:24+5:30
लहान मुलांसाठी सांतक्लॉज म्हणजे गिफ्ट मिळण्याचे हक्काचे माणूस असते
तन्मय ठोंबरे
पुणे : नाताळ सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मुलांसाठी सांतक्लॉज म्हणजे गिफ्ट मिळण्याचे हक्काचे माणूस असते. त्याच्या पोतडीतून अनेक गिफ्टचा वर्षाव मुलांवर होत असतो. त्यामुळे हा सर्वांना प्रिय आहे. आता हाच सांताक्लॉज भाड्याने मिळत आहे. त्यांना विविध ठिकाणी बोलवले जात असल्याने ही एक रोजगाराची संधी आहे.
नाताळ सणाला लाल कपडे, पांढरी शुभ्र दाढी आणि पाठीवर असलेली खाऊची आणि बक्षिसांची पोतडी घेऊन येणारा सांताक्लॉज सर्वांच्या आवडीचा असतो. लहान मुलांना चॉकलेट तर मोठ्यांना विविध बक्षिसे वाटप केली जातात. आता हाच सांताक्लॉज एक व्यवसाय झाला असून, अनेक ठिकाणी त्यांना मागणी असते. मुंबईमध्ये असणारे प्रशांत रामचंद्र जैस्वार यांनी २०११ पासून ही कल्पना सुरू केली. प्रशांत यांनी यंदा नाताळसाठी पुण्यात सांताक्लॉजची सेवा सुरू केली आहे. मुंबईमध्ये १० कलाकार तर पुण्यासाठी ५ कलाकार त्यांनी सज्ज केले आहेत. हे संपूर्ण कलाकार गेली ५ वर्षांपासून काम करीत आहेत. लोकांच्या मागणीनुसार ते सुविधा पुरवत आहेत.
''लोकांना आमच्या वेषभूषेतून आनंद मिळतो आणि सांताक्लॉज हा सर्वांचा खूप आवडता आहे. त्यामुळे त्यांना नाताळात ही सेवा दिली जाते. लोकांना खूश पाहून आम्हालादेखील आनंद होतो. आमच्या कामामुळे अनेकांची चिंता, निराशा दूर होते. त्यामुळे आम्हालाही समाधान मिळत असल्याचे कलाकार सांताक्लॉज केविन फर्नांडिस यांनी सांगितले.''