संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:52 PM2022-06-21T19:52:24+5:302022-06-21T19:52:34+5:30

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी ८ शार्प शूटरांना सांगण्यात आले होते

Santosh Jadhav gets Rs 3.5 lakh for murdering Sidhu Musewala | संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

googlenewsNext

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण ८ शार्प शूटरांना सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील शार्प शूटर संतोष जाधव याला याप्रकरणात साडेतीन लाख रुपये मिळाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे पैसे नवनाथ सूर्यवंशीला मिळाले असून त्या पैशांचा पोलीस शोध घेत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशी यांना १२ जून रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे पंजाब पोलीस व हरियाना पोलिसांनी कसून चौकशी केली. मुंबई पोलिसांनीही दोघांकडे तसेच महाकाल याच्याकडे चौकशी केली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी ८ शार्प शूटरांना सांगण्यात आले होते. या सर्वांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिल्याचे पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात महाकाल याने याबाबतची माहिती दिली. हत्येनंतर १ जून रोजी नवनाथ सूर्यवंशी याचा सिद्धेश महाकाल याला सिग्नल ॲपवर कॉल आला होता. त्याने काम झाले आहे. साडेतीन लाख रुपये मिळाले आहे. सेफ झाल्यावर, तू मला कॉल कर, असे सांगितले. त्यासाठी त्याने सिद्धेश याला एक मोबाईल नंबर दिला. तो मोबाईल नंबर सिद्धेश याने जय हो या नावाने सेव्ह केला होता. त्यावेळी नवनाथ सूर्यवंशी सिद्धेशला म्हणाला की, तू मला अकाऊंट नंबर दे, मग मी तुला पैसे पाठवेल. त्यावेळी सिद्धेश याने त्याला विचारले की, तुम्ही कोठे आहे, तेव्हा त्याने सांगितले की, मी गुजरातला आहे व संतोष पण तिकडे येणार आहे.
नवनाथ सूर्यवंशी ज्या साडेतीन लाख रुपयांचा उल्लेख करतो, ते पैसे मुसेवाला हत्या प्रकरणात शार्प शूटरांना दिलेल्या पैशांपैकी आहेत.

याबाबत नवनाथ सूर्यवंशीकडे ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, नवनाथ याने हे पैसे कोणत्या खात्यात जमा केले अथवा कोठे ठेवले आहेत, याची काहीही माहिती अजून पोलिसांना दिलेली नाही. मुसेवाला हत्येच्यावेळी आपण गुजरातला होतो, असा संतोषने दावा केला होता. मात्र, या संभाषणानुसार संतोष हा तेव्हा गुजरातला आला नव्हता, असे आढळून येत आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Santosh Jadhav gets Rs 3.5 lakh for murdering Sidhu Musewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.