संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:26 PM2022-06-20T19:26:42+5:302022-06-20T19:27:39+5:30
पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून निष्पन्न
पुणे : गँगस्टर संतोष जाधव व त्याच्या मित्रांनी हरियानातील अंबाला छावणी येथील वेश्या व्यवसायावर पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार केली हाेती, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष जाधव, सिद्धेश कांबळे ऊर्फ साैरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी यांनी गुन्हेगारीतून कमावलेल्या मालमत्तेचा पोलीस शोध घेत आहे.
संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना ग्रामीण पोलिसांनी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात साेमवारी हजर केले होते. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ केली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार तेजस कैलास शिंदे याला रविवारी अटक करण्यात आली आहे.
मोका विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर म्हणाले की, संतोष जाधवने दिलेली पिस्तुल वैभव तिटकारे याच्याकडे मिळाली आहे. हे पिस्तुल मध्यप्रदेशातील जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीने मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथक गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथे गेले आहेत. विक्रम ब्रार याने संतोष जाधव व प्रशांत सिंग राजपूत यांना मध्य प्रदेश येथे २ पिस्तुल व दारुगोळा आणण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर नारायणगाव येथील गुन्ह्यात केल्याची कबुली संतोष जाधवने दिली आहे. ताे मुंबई, चंदीगड, सिकर, दिल्ली, गांधीधाम, मांडवी, जोधपूर, अजमेर, पंजाब या ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
राण्या बाणखेले याचा खून झाला, त्यावेळी नवनाथ सूर्यवंशी हा पिंपरी चिचंवड परिसरात होता. त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची शक्यता आहे. सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल हा संतोष जाधव याच्या संपर्कात होता. संतोष जाधव याने अंबाला छावणीत लुटमार केल्यानंतर महाकाल याच्याकडे १० हजार रुपये देऊन ते त्याचा भाऊ विशाल जाधव याला पाठवायला सांगितले होते. १ जून २०२२ रोजी नवनाथ सूर्यवंशी याचा महाकाल याला फोन आला होता. त्याने काम झालं आहे. साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत. तू अकाऊंट नंबर दे, त्यावर पाठवेल, असे सांगितले होते. संतोषही गुजरातमध्ये असल्याचे सांगितले होते.