संतोष जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:28 PM2022-06-28T13:28:03+5:302022-06-28T13:29:31+5:30
विशेष न्यायालयाने सोमवारी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
पुणे : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याला विशेष न्यायालयाने सोमवारी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
बाणखेलेच्या खुनानंतर फरारी संतोषला आश्रय देणाऱ्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.
राण्या ऊर्फ ओंकार बाणखेले याचा पूर्ववैमनस्यातून आंबेगावमधील एकलहरे गावात खून करण्यात आला होता. या खुनानंतर संतोष जाधव हा फरार झाला होता. त्याच्यासह १४ जणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष व महाकाल यांची नावे शार्प शूटर म्हणून पुढे आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणात संतोष जाधव, सौरभ महाकाळ, नवनाथ सूर्यवंशी, तेजस शिंदे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करून आरोपीविरोधात पुरावा गोळा करायचा आहे आणि पुरवणी दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.