सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील 'त्या' शार्प शूटरची संतोष जाधवला होती माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:56 AM2022-07-21T09:56:26+5:302022-07-21T09:56:35+5:30
पोलीस चौकशीत त्याने दिली होती कबुली
पुणे : पंजाब पोलिसांनी अटारी सीमेवर एन्काउंटरमध्ये ठार केलेल्या मुसेवाला हत्याकांडातील दोघा शार्प शूटरांची संतोष जाधव याला माहिती असल्याचे व त्याची नावे चौकशीत सांगितली असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
अटारी सीमेवर पंजाब पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत बुधवारी जगरुप ऊर्फ रुपा आणि मनप्रीत ऊर्फ मन्नू हे ठार झाले. मन्नू यानेच मुसेवाला याच्यावर एके ४७ मधून गोळ्या घातल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर तब्बल ५२ दिवस ते फरार होते.
पंजाबी गायक मुसेवाला हत्याकांडात पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि महाकाल यांची नावे शार्प शूटर म्हणून पंजाब पोलिसांनी जाहीर केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर तर संतोष याला गुजरातमधून अटक केली होती. त्यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस, पंजाब पोलीस यांनी कसून चौकशी केली होती. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील खून तसेच नारायणराव येथील खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच मंचर येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यात सध्या तो मंचर पोलिसांच्या ताब्यात आहे.
संतोष जाधव याला अटक केल्यानंतर जवळपास ४-५ दिवस पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यात मन्नू याला ओळख असल्याचे संतोष जाधव याने सांगितले होते. मुसेवाला हत्याकांडात एकूण ८ शार्प शूटरचा वापर करण्यात आला होता. त्यातील प्रत्येकाला ३ लाख रुपये मिळाले होते. संतोष जाधव याला ज्याने आश्रय दिला होता. त्याच्या सांंगण्यावरून संतोषला पैसे मिळाल्याचे उघड झाले होते. पंजाब पोलिसांनी मुसेवाला प्रकरणाची संतोषकडे संपूर्ण चौकशी केली असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्याकडे त्या प्रकरणात अधिक चौकशी केली नाही. मात्र, त्याने मन्नूविषयी माहिती असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर इतर शार्प शूटरचीही त्याला माहिती होती, असे तपासात पुढे आले होते. पंजाब पोलिसांना संतोष जाधवने नेमकी काय माहिती दिली. त्याचा त्यांना तपासात पुढे काय उपयोग झाला, याची माहिती त्यांनी उघड केली नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनीही त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.