Santosh Jagtap Murder Case: आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी, ३० तासांत केले होते जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:55 PM2021-10-25T17:55:33+5:302021-10-25T17:55:41+5:30
संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली होती
लोणी काळभोर : दौंड तालुक्यातील राहू येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली होती. दोघे फरार झाल्यानंतर इंदारपूर येथील पळसदेव गावातील शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आले होते. त्यांना न्यायदंडाधिकारी यांनी आठ दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गोरख मिसाळ, (वय २९, रा. दत्तवाडी, उरळी कांचन ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६, रा. जूनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरळी कांचन, ता. हवेली ) या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ शाखेच्या पथकाने इंदापूर परिसरातून अटक केली होती. लोणी काळभोर पोलीसांनी दोघांना सोमवार २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले होते. यानुसार आरोपी व सरकारी वकील यांच्यात चर्चा झाली व त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांची बाजू ऐकून वरील दोन्ही आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदलिंगे याच्यावर एक खुनाचा गुन्हा आणि एक खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, तर मिसाळ याच्यावर २ आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. संतोष जगताप याच्यावर एक दुहरी हत्येबरोबर आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्यात जगताप जामिनावर बाहेर होता.
पाठलाग होत असल्याचा आला होता संशय
संतोष जगताप याने शुक्रवारी (दि. २२) रोजी केडगाव येथील एका दुकानाचे उदघाटन केल्यानंतर तो त्याच्या गाडीतून दुपारी उरूळी कांचनच्या दिशेने येत असताना आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याची चाहूल त्याला लागली होती. याच दरम्यान दुपारी संतोष जगताप आणि त्याचे साथीदार उरूळी कांचन येथील हॉटेल सोनाई मध्ये जेवण्यासाठी थांबले. हल्ला होण्याच्या भितीपोटी हॉटेलमध्ये न बसता तो टेरेसवर जेवण करायला बसला होता. त्यावेळी त्याने मुख्य शटर बंद केले. जेवण करुन खाली आल्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याचा खून केला. यावेळी दोन गटात फायरिंग झाले त्यामध्ये स्वागत खैरे या सराईताचा देखील खून झाला. तर जगतापचा अंगरक्षक शैलेंद्रसिंग रामबहाद्दूर सिंग गंभीर हा गंभीर जखमी झाला.