उरुळी कांचन सरपंचपदी संतोष कांचन, तर उपसरपंचपदी संचिता कांचन बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:37+5:302021-02-11T04:11:37+5:30
गावातील वरिष्ठांना लांब ठेवून ही निवडणूक तरुणाईने हाती घेतल्याने, केवळ हवेली तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उरुळी ...
गावातील वरिष्ठांना लांब ठेवून ही निवडणूक तरुणाईने हाती घेतल्याने, केवळ हवेली तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उरुळी कांचन या बड्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पप्पू ऊर्फ संतोष हरिभाऊ कांचन यांची तर उपसरपंचपदी संचिता संतोष कांचन यांची अनपेक्षितपणे बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी लक्षात घेता, याही निवडणुकीत वरील दोन्ही पदासाठी घोडेबाजार होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र उरुळी कांचनमधील तरुण नेत्यांच्या बरोबरच वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत सरपंच व उपसरपंच बिनविरोध करून, पंचक्रोशीत वेगळा संदेश दिला.
या निवडणुकी दरम्यान वेगवेगळ्या आघाड्यांच्या माध्यमातून सहा वार्डांत उमेदवारी दाखल करून ऐनवेळी पॅनेल निर्मिती केलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी जिल्हा परीषद सदस्य महादेव कांचन, माजी सरपंच ज्ञानोबा तुळशीराम कांचन व माजी सरपंच दत्तात्रेय कांचन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेल सतरापैकी बारा जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्वीवाद सत्ता मिळवली, मात्र के. डी. कांचन, महादेव कांचन, ज्ञानोबा कांचन,राजाराम कांचन, जि. प. सदस्या कीर्ती कांचन, दत्तात्रय कांचन , भाऊसाहेब तुपे, आदी मान्यवरांनी एकत्र येत सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध करुन दाखवल्या. यात महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष व या निवडणुकीतील सरपंचपदाचे प्रबळ दावेदार अमित कांचन यांनीही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निकेतन कृष्णाजी धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.१०) सकाळी अकराच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंचपदासाठी अनुक्रमे संतोष कांचन व संचिता कांचन या दोघांचेच अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकरी निकेतन धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी वरील दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निर्धारित वेळेनंतर जाहीर केली. दरम्यान संतोष कांचन व संचिता कांचन यांच्या नावाची सरपंच व उपसरपंचपदी घोषणा होताच ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडून आनंद साजरा केला. तर नवनिर्वाचिच सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांचा सत्कार माजी सरपंच माऊली कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन व बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती योगिनी कांचन, आबासो पाटीलबुवा कांचन, रामचंद्र धोंडिबा कांचन, दत्तात्रय शांताराम कांचन, दिलीप लोंढे, भाऊसाहेब तुपे, अजिंक्य कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच उपसरपंच निवडीसाठी अमित भाऊसाहेब कांचन, मिलिंद तुळशीराम जगताप, स्वप्निशा आदित्य कांचन, राजेंद्र बबन कांचन, ऋतुजा अजिंक्य कांचन, अनिता सुभाष बगाडे, सुनील आबुराव तांबे, मयूर पोपट कांचन, सीमा दत्तात्रय कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे, शंकर उत्तम बडेकर, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, प्रियंका वसंत पाटेकर (कांचन) सुजाता चंद्रकांत खलसे, हे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते तर सायली जितेंद्र बडेकर या अनुपस्थित होत्या.
प्रतिक्रिया :-
पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी रात्रंदिवस एक करणार -
नवनिर्वाचित सरपंच संतोष कांचन. सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच संतोष कांचन म्हणाले, उरुळी कांचन शहराची लोकसंख्या लक्षात घेता, सध्या नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही हे वास्तव आहे. पाच वर्षांपूर्वी उरुळी कांचन शहरासाठी चाळीसहून अधिक कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र मागील पाच वर्षांत संबधित पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी सुधारीत पाणीपुरवठा योजना व कचरा व्यवस्थापन या दोन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
ग्रामीण रुग्णालयासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित उपसरपंच संचिता कांचन उपसरपंचपदी निवडी झाल्यानंतर बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच संचिता कांचन म्हणाल्या, उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी उरुळी कांचन येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सध्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याच परिसरात पुढील काही महिन्यात ग्रामीण रुग्णालय सुरू होईल यासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करणार आहे.