केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:21+5:302021-04-20T04:12:21+5:30
हडपसर : राजकारणापेक्षा आज समाजातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न ...
हडपसर : राजकारणापेक्षा आज समाजातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यातून मार्ग काढत राज्य सरकार जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला यश येईल, असे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हडपसर परिसरात कोरोनाचा ज्वर वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेस मदत करण्यासाठी व्हिजन हडपसरच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, व्हिजन हडपसरचे सदस्य सहभागी झाले होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न असून कंपन्यांच्या संपर्कातून आहेत. मात्र, काही अडचणी येत आहेत. मागील वर्षीपेक्षा या वर्षी कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रासह त्यांना पूरक अधिकारी-कर्मचारी वर्ग २४ तास कार्यरत आहे. प्रत्येकाने सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, हडपसर परिसरात कोविड हॉस्पिटलची संख्या वाढविली आहे. स्टाफ पुरेसा उपलब्ध नाही. आम्ही काही व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. हॉस्पिटल बेडची संख्या लपवत आहेत. जम्बो कोविड सेंटरसाठी जादा निधींची गरज आहे. उद्योजकांशी बोलून याबाबत कार्यवाही केली जाईल. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून हडपसर मतदारसंघात राजकीय मतभेद बाजूला ठेवुन कोरोना प्रसार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.