सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर; बुकिंग सुरू; प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:21+5:302020-11-26T04:26:21+5:30
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या विवाह कार्याला नोव्हेंबर-डिंसेंबरचा मुहूर्त गवसला असला तरी कोरोना अद्यापही आटोक्यात आला नसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण ...
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या विवाह कार्याला नोव्हेंबर-डिंसेंबरचा मुहूर्त गवसला असला तरी कोरोना अद्यापही आटोक्यात आला नसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. विवाह समारंभांकरिता शहरातील मंगल कार्यालयांसह हॉल, सभागृह, लॉन्ससाठी बुकिंग तर होत आहे. मात्र त्याचे प्रमाण हे केवळ ३० ते ४० टक्के इतकेच आहे. यातच वधू किंवा वर पक्षाकडील जवळचे नातेवाईक किंवा वधू-वरापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्यास बुकिंग देखील रदद करण्याची वेळ कुटुंबाबर येत आहे.
कोरोनामुळे ठप्प झालेल्या विवाह समारंभांना शासनाकडून सशर्त परवानगी मिळाल्यामुळे मंगल कार्यालयांसह हॉल, सभागृह, लॉन्स चालकांच्या व्यवसायाचे पुनश्च हरीओम झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लोकांच्या उपस्थितीतच सुरक्षित वावर ठेवून विवाह साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु एरवी पाचशेपासून पाच हजारांपर्यंतच्या लोकांच्या गर्दीत गजबजणारी कार्यालये त्या तुलनेत काहीशी शांत आहेत.
कार्यालयांनीही कोरोनासाठी खास ५० लोकांचेच पँकेज जाहीर केले आहे. तुळशी विवाहानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे कार्यालये, सभागृहांचे बुकिंग देखील काही प्रमाणात झाले आहे आणि विचारणा देखील होत आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने लोकांच्या मनात धास्ती निर्माण होत आहे. सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर जाणवू लागला आहे याला व्यावसायिकांनी देखील दुजोरा दिला आहे. मात्र कोरोनाच्या पाशर््वभूमीवर व्यावसायिक सर्वोतोपरी खबरदारी घेत आहेत. काही जणांकडून दोनशे वऱ्हाड्यांचा आग्रह धरला जात आहे. मात्र व्यावसायिकांकडून त्यास नकार दिला जात आहे.