सहा महिन्यांत लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी, शिक्षकाची अनाेखी माउली भक्ती!
By निलेश राऊत | Published: June 15, 2023 01:11 PM2023-06-15T13:11:51+5:302023-06-15T13:12:44+5:30
सेवानिवृत्त शिक्षकाने २००० पाने हाताने लिहिली
नीलेश राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शिक्षकी पेशा, पण दरवर्षी पंढरीच्या वारीची आस... माउलीभक्तीत तल्लीन होऊन कोल्हापूरमधील राधानगरीपासून आळंदी व आळंदी ते पंढरपूर अशी वारी गेली कित्येक वर्षे न चुकता केली. ही वारी करताना इतर भक्तांप्रमाणेच भक्तिरसात तल्लीन होतानाच माउलींच्या चरणी आगळी-वेगळी सेवा अर्पण करण्याची कल्पना त्या अवलियाच्या डोक्यात आली आणि त्यातूनच पुढे आला ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढण्याचा संकल्प.
दोन हजार पानांची ज्ञानेश्वरी तीही सुवाच्य व सप्तरंगी अक्षरांत लिहून काढण्याचा चंग काेल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे ब्रु. (ता. राधानगरी ) येथील अनिल बळवंत कावणेकर या सेवानिवृत्त शिक्षकाने बांधला. सहा महिन्यांच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी स्वहस्ते तीही सप्तरंगांमध्ये लिहिली. त्यांचे अक्षर इतके सुंदर आणि रेखीव आहे की जणू काही छपाई केल्यासारखेच दिसते.
मुखपृष्ठावर साकारली ज्ञानोबा माउली
या ज्ञानेश्वरीवरील मुखपृष्ठ म्हणजे समाधीस्थ असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय मनाेवेधक चित्र रवींद्र पोतदार यांनी साकारले आहे. अनेक वारकरी ही हस्तलिखितातील ज्ञानेश्वरी पाहण्यासाठी अनिल कावणेकर यांच्याकडे येतात.