सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:58+5:302020-12-29T04:09:58+5:30
पुणे : शहरातील नामांकित सराफी व्यावसायिक मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे (वय ६०) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. व्यवसायातील ...
पुणे : शहरातील नामांकित सराफी व्यावसायिक मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे (वय ६०) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे त्यांनी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ह्दयक्रिया बंद पडल्याने रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणीत सापडले होते. आर्थिक तणावाखाली त्यांनी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी लक्ष्मी रोडवरील दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयात पिस्तुलातून छातीत गोळी झाडून घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करुन ही बाब सांगितली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा व पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन शरीरातील गोळी काढली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असतानाच रविवारी पहाटे यांचे निधन झाले.
....
मिलिंद मराठे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. त्या तणावातून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्या निधनाची अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.
विजय टिकोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे