सराईत दुचाकीस्वार जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:09 AM2018-07-26T04:09:39+5:302018-07-26T04:09:51+5:30
गुन्हे शाखेची कारवाई; रेल्वे स्टेशन परिसरातून वाहनांच्या होत होत्या चोऱ्या
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन, हडपसर व लोणी परिसरातून दुचाकी चोरणाºया एकाला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांच्या ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
विष्णू भाऊराव कुडगिर (वय १९, रा़ खेर्डा, ता. उद्गीर, जि. लातूर सध्या पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्याअनुषंगाने लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. पोलीस कर्मचारी संजय सोनवणे, संतोष चांदणे यांना मिळालेल्या माहितीनुसार विष्णू कुडगिर याला ताब्यात घेतले.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे, उपनिरीक्षक बबन गायकवाड, कर्मचारी सुनील सोनवणे, संतोष चांदणे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड पुढील तपास करत आहेत.
> ४ गुन्हे उघडकीस
त्याच्याकडे तपास केल्यावर रेल्वे स्थानक परिसरात ६ जुलै रोजी पार्क केलेली प्रशांत सुरेश राऊत यांची दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडे पोलिसांनी तपास केला़
त्याने पुणे रेल्वे स्थानक, लोणी व हडपसर येथून आणखी दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याच्याकडून एकूण ४ दुचाकी जप्त करत पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींने पुणे शहर परिसरासह जिल्ह्यातही चोºया केल्या आहेत का? याचा तपास सुरु आहे.