शंभरहून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:42+5:302021-04-27T04:11:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह राज्यातील विविध शहरात घरफोडी, वाहनचोरीचे शंभरहून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह राज्यातील विविध शहरात घरफोडी, वाहनचोरीचे शंभरहून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने भिवंडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ घरफोडीच्या गुन्ह्यातील ९ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
रमेश महादेव कुंभार (वय ४३, रा. काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार गजानन सोनुने व अजित फरांदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली.
रमेश कुंभार हा बंद घराची रेकी करत असे. त्यानंतर सुरक्षारक्षक नसल्याची खात्री केल्यावर कटावणीच्या सहाय्याने घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करीत. घरातील ऐवज आणि रक्कम घेऊन पसार होत असे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, कादीर शेख, समीर पटेल यांनी केली.
..........
रमेश कुंभार हा सराईत घरफोड्या असून त्याच्यावर पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक शहरातील अनेक पोलीस ठाण्यात १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.