सराईत गुन्हेगारास खंडणीप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:37+5:302021-01-19T04:12:37+5:30
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: विजय राऊत यांचे एमआयडीसीमधील एका कंपनीत जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. सराईत गुन्हेगार संतोष ...
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: विजय राऊत यांचे एमआयडीसीमधील एका कंपनीत जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. सराईत गुन्हेगार संतोष मधुकर मांजरे ( वय २९ वर्षे,रा.कोरेगाव खुर्द, ता.खेड ) याने काम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन ' मला दर महिना पन्नास हजार रुपये हप्ता दे, नाही तर काम सोडून दे ' असे विजय राऊत यांना धमकावले आले,त्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सराईत गुन्हेगार मांजरे याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे दिसून आले. गुप्त बतमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष मांजरे हा कुरकुंडी गावाकडून कोरेगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला परंतु त्याला आपल्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला असल्याचे कळल्याने मांजरे याने आपल्या ताब्यातील चारचाकी रस्त्यावर सोडून शेजारील उसाच्या शेतात पळ काढला परंतु पोलिसांनी अधिक कुमक मागवून उसाच्या शेतीला चारही बाजूने वेढा घालून गुन्हेगार मांजरे यास शरण येण्यास सांगितले. परंतु तो शरण न येता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे मिळून आली तसेच त्याच्या चारचाकी गाडीची तपासणी केली त्यामध्ये तीन लोखंडी कोयते व एक लोखंडी रॉड सापडला आहे.यापूर्वी संतोष मांजरे याच्यावर २०१३ मध्ये दोन खुनाचे तसेच दोन बेकायदा हत्यार बाळगणे गुन्हे दाखल असून आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.