सराईत चोराला कोथरूड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह ३ दुचाकी जप्त
By नितीश गोवंडे | Published: May 15, 2024 03:42 PM2024-05-15T15:42:32+5:302024-05-15T15:43:06+5:30
अटक केलेल्या आरोपीकडून लॅपटॉपसह तीन दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे : उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोथरूडपोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून लॅपटॉपसह तीन दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आ आहे. अमित सुभाष मोरे (३१, रा. विश्वशांती चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोथरूड येथील धनलक्ष्मी सोसायटीतील फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन ३८ हजार ५०० रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल व अॅपरन चोरून नेल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ मे रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास घडला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी चोरी अमित मोरे याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मुद्देमालासह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून कोथरूड आणि पौड रोड पोलिस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी बालाजी सानप, पोलिस अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णू राठोड, अजय शिर्के आणि मंगेश शेळके यांच्या पथकाने केली.