कोल्हापूरकरांच्या मदतीला सरसावली पुणे महानगरपालिका; १७ टँकरसह २७ जणांचे पथक रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:00 PM2021-07-26T13:00:43+5:302021-07-26T13:17:38+5:30
कोल्हापूर आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी केलेल्या या विनंतीवर पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.
पुणे : संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणबरोबरच, सांगली, कोल्हापूर सर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात तर दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे. कोल्हापूर शहरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. अक्षरशः शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या काही भागात जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. .
नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडे टँकर अपुऱ्या संख्येत उपलब्ध आहेत. त्यामुळे अडचण होत आहे. कोल्हापूर आयुक्तांनी, या धर्तीवर पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी अशी विनंती केली. प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.
टँकर्स बरोबर सुपरवायजर, इलेक्ट्रीशियन, असे एकूण २७ जणांचे पथक आज कोल्हापूरला पोहोचले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची संपूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
आपत्ती च्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानलेले आहेत