सारथी, बार्टी, महोज्योतीची वादग्रस्त परिक्षेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार
By प्रशांत बिडवे | Published: January 10, 2024 10:56 AM2024-01-10T10:56:16+5:302024-01-10T11:07:03+5:30
बुधवारी (दि. १०) परीक्षा घेण्यात आली मात्र, याही परीक्षेची प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही.
ज्ञानेश्वर भंडारे
पुणे/पिंपरी - सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी (दि. १०) परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेत पुण्यातील वडगाव येथील केंद्रावर पेपर सील पॅक न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा २४ डिसेंबर २०२३ ला घेण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सेट' विभागावर या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका 'सेट-२०१९'च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशीच्या तशी असल्याचे आढळले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी (दि. १०) परीक्षा घेण्यात आली मात्र, याही परीक्षेची प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर बहिष्कार घालत बाहेर येऊन घोषणा दिल्या. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं, वर पाय... बार्टी, सारथी, महाज्योति प्रशासनाचा धिक्कार असो, अशा यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
दरम्यान, बुधवारी पुण्यातील काही सेंटर्स वर विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यास नकार देत कॉलेजच्या प्रवेशद्वारावर एकत्रित येत आंदोलन केले. तसेच इतर संस्थाचे विद्यार्थी परीक्षेस गेले असता काही प्रश्नपत्रिकाना सील नसल्याने प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.
पुण्यातील काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या सेंटर वर बार्टीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित जमत परीक्षा केंद्रात न जाता प्रवेशद्वारावर उभा राहत आंदोलन केले. दरम्यान, इतर संस्थांचे उमेदवार परीक्षा देण्यास केंद्रात गेले असता ए आणि बी प्रश्नपत्रिकाना सील होते तर सी आणि डी प्रश्नपत्रिका ना सील नव्हते तसेच त्याच्या चक्क झेरॉक्स काढून त्या वितरित केल्या असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटली असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे अशी माहिती माहिती प्रत्यक्षदर्शी उमेदवाराने 'लोकमत'ला दिली.
सरसकट फेलोशिप मंजूर करावी
प्रथमता मी पुणे विद्यापीठाचा निषेध करतो आज दिनांक 10जानेवारी 2024 हा सील नसलेला पेपर आल्यामुळे आम्ही तो स्वीकारला नाही आणि परीक्षा केंद्राच्या बाहेर आलो आहे आणि हा पेपर 100टक्के फुटला आहे आमची मानसिकता नसताना सुद्धा पेपर घेण्यात येत होता, ते ही जबरदस्ती करून 2- 2व वेळा पेपर फूटी झाली असून या नंतर आम्ही पेपर परत देणार नाही. सरकारने आमची सरसकट फेलोशिप मंजूर करावी आणि आमच्या संशोधनाचा मार्ग मोकळा करावा. - प्रथमेश दत्तात्रय बनसोडे, संशोधक विद्यार्थी