‘सारथी’ उभारणार प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:26+5:302021-07-12T04:08:26+5:30
अभिजित कोळपे पुणे : कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी येत्या काळात सारथी संस्थेच्या ...
अभिजित कोळपे
पुणे : कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी येत्या काळात सारथी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यातील एक म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार आहे अशी माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० मुलांसाठी आणि १०० मुलींसाठी प्रत्येकी एक निवासी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्यात मुलांना निवास, दोन वेळचे जेवण आणि नाष्टा दिला जाणार आहे. अल्प उत्पन्न आणि विशेषतः मध्यम उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्य शासनाने सारथी संस्थेला नुकतीच स्वायत्तता दिली आहे. येत्या वर्षभरात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच राज्यातील आणि केंद्र शासनाच्या इतर विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना शालेय पातळीवर दर्जात्मक शिक्षण मिळावे यासाठी या वसतिगृहामधून चांगली वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.
राज्यातील ३२ टक्के मराठा समाजातील खूप मोठ्या वर्गाचे उत्पन्न हे अतिशय तुटपुंजे आहे. समाजातील बहुसंख्य घटकाचा उदरनिर्वाह हा शेतीवर आधारित आहे. मात्र, कोरडवाहू शेती, नापीक, हवामान बदलाचा फटका, योग्य बाजारभाव मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. तसेच मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द केल्याने त्यात आणखीच भर पडली आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न जटिल बनत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर सारथीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
----
कोट
विविध उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाने सारथी संस्थेला स्वायत्तता दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम हाती घेत आहोत. त्यातील एक म्हणजे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. पुण्यासह पाच-सहा जिल्ह्यांत जागेची आम्ही पाहणी केली आहे. लवकरच याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करण्यात येईल.
- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी