मराठा-कुणबी समाजातील तरुण-तरुणीसाठी सारथीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:50+5:302021-06-02T04:10:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा व कुणबी समाजातील तरुण-तरुणींच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा व कुणबी समाजातील तरुण-तरुणींच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार (दि. १) रोजी पार पडली. या बैठकीत सारथी संस्थेमार्फत एम. फिल, पीएच.डी. करिता, एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शनसाठी इच्छुक व पात्र मुला-मुलींसाठी आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)चे व्यस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले की, संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आला. यात एम.फिल, पीएच.डी.करिता मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण २०७ विद्यार्थ्यांची निवड करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, ३४ अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले. एमपीएससीच्या सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दरवर्षी अंदाजे ५०० रिक्त जागा घोषित होतात. यासाठी सारथी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून पात्र अर्जदारांना ऑनलाइन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत २०२०-२१मध्ये अंदाजे २०,००० रिक्त पदे जाहीर झाली. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाइन निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर एमपीएससीमार्फत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेशपरीक्षेद्वारे लक्षित गटातील २५० उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे एकूण ४०० उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलखतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर एमपीएससी स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी २०१९-२० मधील एमपीएससी पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण २४००० रुपये किंवा एकरकमी आर्थिक सहाय्य १५००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी एक पर्याय विद्यार्थी निवडू शकतात.
उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्नामुळे मिळाली जागा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भांबुर्डामधील सी.स.नं १७३/१ब मधील ४९६३ चौ.मी जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली आहे. यामुळे पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.