सारडा यांच्या हातून संमेलनाचे अध्यक्षपद निसटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:53+5:302021-02-11T04:10:53+5:30
पुणे : साहित्यातील असत्यता, ढोंगीपणा, लबाडी खपवून न घेता शंकर सारडा यांनी आयुष्यभर वाङ्मयव्यवहार हे ब्रीद पाळले. आयुष्यभर साहित्याची ...
पुणे : साहित्यातील असत्यता, ढोंगीपणा, लबाडी खपवून न घेता शंकर सारडा यांनी आयुष्यभर वाङ्मयव्यवहार हे ब्रीद पाळले. आयुष्यभर साहित्याची निखळपणे सेवा करणाऱ्या समीक्षकाच्या हातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निसटले, तरी त्यांची वाङ्मयीन पात्रता कोणत्याही संमेलनाध्यक्षपदापेक्षा कमी नव्हती, अशा शब्दांत साहित्यिकांनी बुधवारी (दि.१०) ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा यांना श्रद्धांजली वाहिली.
अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे हिंदी राष्ट्रभाषा कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. ही सभा हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. गं. फगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बालसाहित्यिक राजीव तांबे, निर्मला सारडा, डॉ. दिलीप गरूड, ज्योतिराम कदम, दीपक करंदीकर, प्रा. विश्वास वसेकर, प्रा. मीरा शिंदे, सुरेश नावडकर, आनंद सारडा, भरत सुरसे उपस्थित होते.
साहित्य हाच ध्यास आणि पुस्तके हाच श्वास माणून जगणाऱ्या शंकर सारडा यांच्या लेखनीचा साहित्याच्या सर्वच क्षेत्रात वावर होता. त्यांच्या नावाने वृत्तपत्रांच्या पुरवण्या ओळखल्या जात होत्या. सारडा आज नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाही, अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शोकसंदेशातून व्यक्त केली.
ज. गं. फगरे म्हणाले, शंकर सारडा हे कमी आणि कामाचेच बोलायचे मात्र त्यांची लेखणी प्रचंड बोलत होती. त्यांनी जे साहित्य निर्माण केले. त्यास समाजाने स्वीकारले. त्यांच्या साहित्याला नेहमीच वाचकांचा प्रतिसाद मिळाला.
राजीव तांबे म्हणाले, सारडा यांच्या लेखनाला उंची होती. मोठी माणसे आपले मोठेपण कधीच दाखवत नाहीत. सारडा यांनी अनेक लिहित्या हातांना बळ दिले. माझ्या लेखनाचे श्रेयही सारडा यांचेच आहे. बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, प्रा. विश्वास वसेकर, ज्योतिराम कदम, निर्मला सारडा, आनंद सारडा, दीपक करंदीकर, भरत सुरसे यांनी श्रद्धांजली वाहिली. डॉ. दिलीप गरूड यांनी प्रास्ताविक केले.