"पटेलांनी इंग्रजांना आव्हान देत पुतळा बसवला, आज रस्त्याचे नाव बदलले तरी गोंधळ घातला जातोय"
By नम्रता फडणीस | Published: August 1, 2023 01:29 PM2023-08-01T13:29:09+5:302023-08-01T13:35:00+5:30
मोदींनी जोडले टिळक आणि अहमदाबादचे नाते
पुणे : लोकमान्य टिळक अहमदाबादला आले, तेव्हा त्यांचे स्वागत करायला आणि त्यांना ऐकायला 40 हजार लोक आले होते. त्यात सरदार पटेल पण होते, अशा शब्दांत लोकमान्य टिळक आणि अहमदाबाद यांचे नाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलगडून सांगितले. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते.
पुरस्काराची रक्कम नमामी गंगेसाठी अर्पण-
आज मला मिळालेला सन्मान अविस्मरणीय अनुभव आहे. जी संस्था थेट लोकमान्य टिळक यांच्याशी जोडलेली आहे. त्या संस्थेकडून सन्मान मिळणं हे माझ्या भाग्याचे आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे इथे विद्वत्ता चिरंजीव आहे. पुण्यनगरी सन्मान हा माझा गौरव आहे. जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी देखील वाढते. आज टिळक यांचे नाव जोडलेला पुरस्कार मला मिळाला आहे. हा सन्मान मी देशवाशीयांना अर्पण करतो. देशाच्या सेवेसाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, तो पुरस्कार मिळणं गौरवशाली आहे. या पुरस्काराची रक्कम मी गंगेसाठी अर्पण करतो, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
विरोधकांना टोला-
पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात टिळकांचे मोठे योगदान होते. स्वातंत्र्य संग्रामाला संजीवनी देण्याचे काम टिळकांनी केले, असे सांगत मोदी यांनी टिळकआणि गुजरातचे नाते विशद केले. गुजरातमधल्या लोकांशी टिळकांचे खास नाते होते असे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांनीच लोकमान्य यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्हीक्टोरिया गार्डन ही जागा निवडली होती, असे सांगताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. सरदार पटेल यांनी इंग्रजी हुकूमतीला आव्हान दिले होते. आज एखाद्या रस्त्याचे नाव भारतीय विभूतीच्या नावावरून दिले तरी गोंधळ घातला जातो असा टोलाही मोदी यांनी विरोधकांना लगावला. त्यांची झोप उडून जाते, असंही मोदी म्हणाले.