पाचशे फूट खोल दरीतून काढले बाहेर; महिनाभरापासून बेपत्ता सर्जा दिवाळीला शेतकऱ्याच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:30 PM2022-10-25T17:30:17+5:302022-10-25T17:52:36+5:30
सर्जा बैलापर्यंत जाण्यासाठी रेस्क्यू टीमला लागले ५ तास
पुणे : खोल दरीत तो पडला होता. पायाला लागल्याने तिथून कुठेच जाता येत नव्हते. कोणाला तरी तो दिसला आणि मग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्याला सुखरूप तिथून बाहेर काढले. आता तो सर्जा बरा होत असून, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकरी राजाला त्याचा हा सर्जा परत मिळाला आहे. म्हणून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. ५०० फूट खोल दरीतून वर काढायला तब्बल ५ तास लागले.
ही गोष्ट आहे सर्जा नावाच्या बैलाची. पाबे घाटातील रांजणे गावामधील एका शेतकऱ्याचा तो बैल महिनाभरापासून बेपत्ता होता. मालकाने तो जिवंत असल्याची आशा ठेवली नव्हती; पण दिवाळीच्या मुहूर्तावर तो सर्जा परत आपल्या मालकाकडे आला आहे.
पुण्यातील रेस्क्यू टीमला एक बैल पाबे घाटातील खोल दरीत असल्याचा काॅल आला. मग रेस्क्यू टीम लगेच रवाना झाली. खोल दरीत सर्जा असल्याने त्याला वर आणणे एक दिव्यच होते. मग तिथेच सुरुवातीला उपचार सुरू केले. कारण सर्जाच्या अंगावर जखमा होत्या. पाय लंगडत होता. तिथेच त्याला सलाइन लावले. त्यानंतर स्ट्रेचर आणून त्यावर एका पठारावर त्याला हलवले. तिथे सर्जाला थोडं तणावमुक्त होऊ दिले. यानंतर रेस्क्यू टीमने त्याला रांजणे गावात आणले आणि तिथेच उपचार केले. आता सर्जा बरा होत आहे. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दिवाळीत घरची दिवाळी दूर ठेवत त्या सर्जाला दरीतून बाहेर काढून खरीखुरी आनंदाची दिवाळी साजरी केली.
महिनाभर बैल बेपत्ता
रांजणे गावातील एका शेतकऱ्याचा सर्जा नावाचा बैल आहे. तो काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. मालकाने त्याचा खूप शोध घेतला, पण कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे मालकाने सर्जाची आशा सोडून दिली होती.
असे केले रेस्क्यू
सर्जा बैलापर्यंत जाण्यासाठी रेस्क्यू टीमला ५ तास लागले. रात्री तिथून वर आणणे शक्य नसल्याने रात्रभर तिथेच त्याला सलाईन लावले. थंडीत कुडकुडत रेस्क्यूची टीम तिथे कार्यरत होती. त्यानंतर सकाळी बैलाला वर आणण्यासाठी सहा तास लागले.