Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:28 AM2023-12-14T09:28:58+5:302023-12-14T09:29:34+5:30
पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी ‘सवाई’च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले
पुणे : सरोदवरील तंतुवाद्याच्या सुरेल तारा छेडून पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी धीरगंभीर वादनातून रसिकांच्या हृदयावर पकड घेतली. सरोदवर लीलया फिरणाऱ्या त्यांच्या जादुई बोटांनी सुरेल आविष्काराची सुखद अनुभूती रसिकांना दिली, तर पंडित उल्हास कशाळकर यांच्या रससिद्ध गायकीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या उत्तरार्धाचा कळस साध्य गाठला.
पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी ‘सवाई’च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले. आलाप, जोड, झाला या पारंपरिक वादनाने त्यांनी राग जयजयवंती खुलविला. विलंबित त्रितालातील त्यांचे वादन रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरली. त्यानंतर झपताल आणि द्रुत त्रितालातील वादनात त्यांनी लयकारीचे उत्तम दर्शन घडवले. सरोद आणि तबल्याची सवाल-जवाबांची जुगलबंदीही रंगली.
‘सवाई’च्या पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्धा स्वराविष्काराने झाली. राग दरबारीचे गंभीर सूर स्वरमंडपात निनादताच, रसिकांनी भरभरून दाद दिली. विलंबित तिलवाडा तालात निबद्ध ‘दुल्हन आज बनी’ या रचनेच्या माध्यमातून पं. कशाळकर यांनी दरबारीचे राजस रूप उलगडत नेले. द्रुत बंदिशीत त्यांनी तबल्याच्या साथीने लयकारीचे वैविध्यपूर्ण आविष्कार दर्शवले. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची तर सुधीर नायक यांनी संवादिनीची रंगत वाढविणारी साथसंगत केली. ‘वसंत’मधील ‘फूली बनी बेलरिया’ आणि ‘फगवा ब्रिज देखन को चलो री’ या रचनांतून ऋतूदर्शक बदलांचे यथार्थ वर्णन त्यांनी स्वराकृतींतून रसिकांना घडवले. तराणा सादर करून ‘तुम हो जगत के दाता’ या भैरवीने त्यांनी गायनाची सांगता केली.
महोत्सवातील आजचे सादरीकरण (दि. १४)
- अंकिता जोशी (गायन)
- पं. उपेंद्र भट (गायन)
- पार्था बोस (सतारवादन)
- डॉ. अश्विनी भिडे देशपांडे (गायन)