देवगावचे सरपंच,उपसरपंचासह दोन सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:51+5:302021-03-28T04:11:51+5:30
मंचर:देवगाव (ता.आंबेगाव) येथील सरपंच,उपसरपंच व दोन महिला सदस्यांना स्वतः अथवा कुटुंबातील व्यक्तींनी शासकीय गायरान जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी ...
मंचर:देवगाव (ता.आंबेगाव) येथील सरपंच,उपसरपंच व दोन महिला सदस्यांना स्वतः अथवा कुटुंबातील व्यक्तींनी शासकीय गायरान जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपात्र ठरवले आहे.
याप्रकरणी माजी सरपंच उज्वला बाबाजी गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.
मार्च 2019 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत योगिनी दिलीप खांडगे यांची सरपंचपदी निवड झाली होती. उपसरपंचपदी दत्तात्रय महादू खांडगे व ग्रामपंचायत सदस्य द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या नातेवाईकांनी तर ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई विठोबा खांडगे यांनी स्वतः शासकीय गायरानावर अतिक्रमण केल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात यावे असा अर्ज गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सुनावणी घेतली.या सुनावणीत सरपंच योगिनी खांडगे यांच्या सासूबाई राधाबाई पाटीलबुवा घाडगे यांनी शासकीय गायरान गट क्रमांक 1/1 मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 218 व 218/1 अतिक्रमण करून बांधले आहे.तर उपसरपंच दत्तात्रय महादू खांडगे यांच्या पत्नी सुकेशनी दत्तात्रय खांडगे यांनी शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 204/1 व नोंद नसलेली एक मजली इमारत व त्याच्यापुढे पत्राशेड अतिक्रमण करून बांधले आहे.ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई विठोबा खांडगे यांनी स्वतःच्या नावे असलेली ग्रामपंचायत मिळकत क्रमांक दोनशे अकरा ही शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये अतिक्रमण करून बांधली आहे. ग्रामपंचायत सदस्य द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या सासुबाई छबुबाई व कुसुमबाई लक्ष्मण कोकणे यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 16 शासकीय गायरान गट क्रमांक 1/1 मध्ये अतिक्रमण करून बांधले आहे. यामुळे या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी उज्वला गावडे यांनी केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचा अहवाल मागवून घेतला. त्यानंतर सरपंच योगिनी खांडगे, उपसरपंच दत्तात्रेय खांडगे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई खांडगे व द्वारका कोकणे यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे असा निर्णय दिला आहे.
आंबेगाव तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व दोन महिला सदस्यांना गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले.