निवडणुकीतील खर्चवसुलीसाठी रस्ता फोडला, सरपंचाची करामत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:31 AM2018-11-07T00:31:37+5:302018-11-07T00:31:55+5:30
माझे निवडणुकीत सरपंच पदासाठी २२ लाख रूपये खर्च झाले आहेत. ते मी कसे वसुल करणार? या कामाच्या माध्यमातूनच पैसे वसुल करणार?
बिजवडी - सुस्थितीतील सिमेंटचा रस्ता फोडून गटारीचे पाईप का टाकता, त्यापेक्षा रस्त्याच्या कडेने भूयारी गटारीचे काम करा, अशी मागणी न्हावी ग्रामस्थांनी केली असता. सरकारी काम असेच असते. माझे निवडणुकीत सरपंच पदासाठी २२ लाख रूपये खर्च झाले आहेत. ते मी कसे वसुल करणार? या कामाच्या माध्यमातूनच पैसे वसुल करणार, अशा उद्धट भाषेत सरपंच बळी बोराटे यांनी ग्रास्थांना उत्तरे दिली.
इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे मागील वर्षी सरपंच पदाच्या निवडणुकीत झालेला २२ लाख रुपये खर्च वसूल करण्यासाठी विद्यमान सरपंचांनी ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगाकडून आलेल्या दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत निधीचा अनावश्यक खर्च केला आहे. विशेष म्हणजे कामाचा ठेका सरपंच पुत्र नवनाथ बोराटे यांनी घेतला आहे. या माध्यमातून निवडणुकीसाठी झालेला खर्च वसूल करणार असल्याचे सरपंच बोलून दाखवत आहेत.
दोन वर्षांपूर्वीच न्हावी येथील दलित वस्ती मध्ये सुस्थितीत असणाऱ्या सिमेंटचा रास्ता मधोमध फोडून त्याची पूर्ती दुर्दशा करण्यात आली आहे. वास्तविक एकदा बांधलेला रास्ता पुढील ५ वर्षे फोडता येत नाही, अशी माहिती समोर आली आहे. या ठिकाणावरील रस्ता कोणालाही विश्वासात न घेता किंवा त्याची कल्पनाही न देता फोडुन त्यात गटारीचे पाईप टाकण्यात आले आहेत.
चेंबर हे रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्यापासून त्याची उंची १५ सेमी एवढी आहे. तसेच गटाराचे चेंबर दर्जाहीन आहे. तसेच याठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
सबंधीत भूयारी गटार ही रास्ता न फोडता रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने घेता आली असती. मात्र रास्ता फोडून मध्यभागी गटाराचे पाईप टाकले आहेत. त्यामळे चांगल्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झाल्येल्या रस्त्याच्या दूरवस्थेबद्दल ग्रामविकास अधिकारी रवींद्र बनसुडे याना विचारले असता ग्रामपंचायतिची कामे अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.
तर सरपंच बळी बोराटे याना याबदद्दल विचारले असता त्यांनी माझा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २२ लाख रुपये खर्च केले असल्याने ते कुठून वसूल करायचे, अशी उद्धट उत्तरे दिली.
ग्रामविकास अधिकारी रवींद्र बनसुडे आणि सरपंच बळी बोराटे यांनी संगनमताने आलेला निधी हडपण्याचा डाव असल्याची तक्रार गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे बिल काढण्यात येऊ नये असे त्यांनी संबंधितांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामपंचायतिची कोणतीही कामे करताना कोणत्याच ग्रामपंचायत सदस्याला विचारात घेतले जात नसल्याचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मधुकर घाडगे यांनी सांगितले. याबाबत दलित वस्ती मधील ग्रामस्थांनी विचारणा केली असता गावातील रेशन दुकान स्वत: सरपंचांकडे असल्याने ‘तुमचे रेशन बंद करू का’ असा सज्जड दम येथील ग्रामस्थांना देत असल्याचे सांगितले.